बेलपाडा, मासले, तालुका- मुरबाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात पर्यावरणविषयक जाणीव वाढू लागली आहे. त्यामुळे जैवविविधतेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून विकासाच्या योजना आखल्या जाऊ लागल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील नियोजनात जैवविविधतेचा मुद्दा प्राधान्याने विचारात घेतला जाऊ लागला आहे. मुरबाड तालुक्यातील एक गावही अशाच पद्धतीने विकासाच्या वाटेवर आहे. कल्याण-मुरबाड महामार्गापासून पाच ते सहा किलोमीटरवर तर बदलापूर-मुरबाड रस्त्याला अगदी लागूनच असलेले मासले ग्रुप ग्रामपंचायतीतील बेलपाडा हे गाव जैवविविधतेच्या माध्यमातून विकसित होत आहे.

मुरबाडपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या मासले ग्रामपंचायतीत एकूण नऊ  पाडे आहेत. साधारणत: एक हजार लोकवस्तीचे बेलपाडा हे बारवी धरणाच्या लागूनच असलेले जैवविविधतेचा इतिहास सांगणारे गाव आहे. मरळ मासा, लक्ष्मी कमळाची विशिष्ट जात, चितळ आणि विविध जातीच्या दुर्मीळ पक्ष्यांचा वावर बेलपाडा आणि बारवीच्या तब्बल ६०० हेक्टर जंगल परिसरात होता, असा इतिहास आहे. राज्यात शिकारबंदीचा पहिला प्रयोगही लालू दुर्वे यांच्या माध्यमातून तत्कालीन मुरबाड तालुक्यात झाला होता.

त्यामुळे जैवविविधता आणि त्याच्यासाठी लढण्यासाठीचा इतिहासही बेलपाडा या भागात आहे. जरी भौगोलिक आणि जैवविविधतेच्या बाजूने संपन्न असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून गावाची परिस्थिती दयनीयच आहे. गावात पाणीपुरवठय़ाच्या नावाने राज्यापेक्षा अधिक वेगळी परिस्थिती नाही. हाकेच्या अंतरावर बारवी धरण असूनही गावात पाण्याची परिस्थिती बिकट आहे. गावातील सर्वात मोठा तलाव हा जवळपास १२ एकर परिसरात पसरलेला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या तलावात मोठय़ा प्रमाणावर गाळ साचला आहे.

बंधारा गेल्या तीन दशकांपासून दुर्लक्षित

येथे काही वर्षांपूर्वी डोंगरांच्या विशिष्ट रचनेचा फायदा घेत मोठा बंधारा बांधण्याचा प्रयत्न झाला होता. डोंगरांच्या बाजूने काही प्रमाणात भराव टाकून जवळपास तीस फुटांपर्यंतचा बंधारा बांधण्यात आला होता. मात्र राजकीय नेतृत्व  बदलाने याकडे दुर्लक्ष झाले. आजही येथे बंधाऱ्याची दोन टोके स्पष्टपणे दिसतात. फक्त मधला काही मीटरचा पट्टा जोडल्यास येथे मोठय़ा प्रमाणावर पाणीसाठी शक्य होईल, असे ग्रामस्थ सांगतात.

याच तलावात काही वर्षांपूर्वी अस्सल भारतीय जातीचे कमळ अस्तित्वात होते असा इतिहास गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात. मरळ जातीचा चविष्ट मासाही या तलावात काही वर्षांपूर्वी अस्तित्वात होता, असे सांगितले जाते. त्यामुळे अशा जैवविविधतेच्या दृष्टीने गावाचा विकास होण्यासाठी सध्या अश्वमेध प्रतिष्ठान ही संस्था काम करते आहे. या संस्थेच्या वतीने सध्या जैवविविधतेबाबतचा आराखडा तयार करण्यात येत असून लवकरच महाराष्ट्र जैवविविधता परिषदेच्या माध्यमातून येथे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा आणि सर्वागीण विकासाच्या मुद्दय़ावर काम करत असताना जैवविविधता विषयालाही सोबत घेण्यात आले आहे. त्याबद्दल हे गाव संपूर्ण जिल्ह्य़ात कौतुकाचा विषय ठरले आहे.

काही महिन्यांपूर्वी गावात जाण्यासाठी दोन्ही महामार्गापासून कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र बेलपाडय़ाची विशिष्ट भौगोलिक रचना रस्तेनिर्मितीत अडथळे ठरते आहे. दाटीवाटीने घरांची निर्मिती झालेल्या गावात मोकळेपणा पाहायला मिळत नाही. डोंगराच्या कुशीत वसलेले बेलपाडा हे गाव निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने अनेकदा दृष्टीस पडत नाही. गावात सांडपाणी व्यवस्था अस्तित्वात नसल्याने सांडपाणी मोठय़ा प्रमाणावर उघडय़ावर पसरते. त्यामुळे अनेकदा स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. गावातील अनेक घरे ही कच्ची असून नव्याने बांधण्यात येत असलेली अनेक घरे काँक्रीटमध्ये बांधण्यात येत आहेत. त्यामुळे गावात मोठी घरे पाहावयास मिळत नाहीत.

रोजगार हाच मोठा प्रश्न

बेलपाडा हे गाव मुरबाडपासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर तर कल्याण आणि बदलापूरसारख्या शहरांपासून २० ते २५ किलोमीटरवर आहे. त्यात गावात शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे अनेक ग्रामस्थ नोकरी व्यवसायासाठी शहरात जातात. त्यामुळे येथे गेल्या अनेक वर्षांत मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर झालेले आहे. गावाचे गावपण टिकवण्यासाठी गावात रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यामुळे बारवी धरण क्षेत्रातील जंगल सफारी असेल वा जैवविविधतेच्या संपन्नतेचा विषय असेल, अशा माध्यमातून गावकऱ्यांसाठी उत्पन्नाची साधने निर्माण केली जाऊ  शकतात, असे गावातील ग्रामस्थ अविनाश हरड सांगतात. सध्या अनेक रहिवासी शेतीशिवाय वीटभट्टी आणि मुरबाड, बदलापूरसारख्या शहरांमध्ये नोकरीस जात असतात. त्यामुळे येथे उत्पन्नांची साधने निर्माण करण्याची गरज येथील ग्रामस्थ व्यक्त करतात. येथील खाद्यसंस्कृती पर्यटकांना चाखता यावी, यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्या मुरबाड आणि आसपासचा परिसर पर्यटनासाठी विकसित केला जातो आहे. याच विकासाचा फायदा बेलपाडा या गावाला होऊ शकतो.

शिक्षणाबाबतही गाव काही अंशी मागे असले तरी गावातील अनेक विद्यार्थी पुणे, मुंबईसारख्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. प्राथमिक शाळेत सध्या डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावातील काही विद्यार्थी अभियंते आणि इतिहासतज्ज्ञ बनून आपल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या गावात एक ग्रंथालयही अस्तित्वात आहे, मात्र त्याचा विकास होण्याची गरज आहे. गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयाने याबाबत पुढाकार घेतला असून येत्या वर्षभरात महाविद्यालयातील विविध विषयांच्या विभागातर्फे येथे प्रबोधन आणि श्रमदानातून शिक्षण देण्याचा प्रयोग होणार आहे. पर्यटन विकासाच्या माध्यमातून आसपासचा परिसर विकसित होत असताना किमान त्याच्या आसपासची गावेही विकसित व्हावीत हीच अपेक्षा आता येथील नागरिक व्यक्त करत आहे.

खासरा नावाचे प्रसिद्ध कंदमुळे

लक्ष्मी कमळ आणि त्यासारख्या अनेक कमळांच्या जाती येथील तलावात यापूर्वी पाहिल्याचे अनेक ग्रामस्थ सांगतात. या कमळाखालील खोडातून खासरा नावाचे कंदही मिळत असे. खासरा कंद चविष्ट आणि शरीरासाठीही उपयोगी मानले जाते. त्यामुळे कमळाच्या जाती जगवल्यास त्यातून असे कंदही उपलब्ध होऊ  शकते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biodiversity maintain in murbad
Show comments