ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अनेक कर्मचारी ठरवून दिलेल्या वेळेत कामावर उपस्थित राहत नसल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. हि बाब लक्षात घेऊन अशा लेटलतीफ कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रीक यंत्रे बसविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या यंत्रामध्ये डोळ्यांद्वारे ओळख पटवून हजेरीची नोंद केली जाणार आहे.
हेही वाचा >>> कल्याण मधील निवृत्त तिकीट तपासणीसाची शहापूरमध्ये हत्या
ठाणे महापालिकेच्या आस्थपनावरील अनेक अधिकारी व कर्मचारी कामावर वेळेवर उपस्थित राहत नव्हते. त्याचा फटका पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसत होता. कर्मचारी वेळेवर येत नसल्याने नागरिकांना पालिकेत ताटकळत उभे रहावे लागत होते. हि बाब आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अशा कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी पालिकेत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रीक यंत्रे बसविली. पालिका प्रभाग समित्यांमध्येही अशाचप्रकारची यंत्रणा बसविण्याची कामे सुरू आहेत. या यंत्राद्वारे उशीरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मिळवून त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येत आहेत. यामुळे पालिकेतील लेटलतीफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात शिस्त लागल्याचे दिसून येत आहे. त्यापाठोपाठ आता कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही अशाचप्रकारची यंत्रणा बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
हेही वाचा >>> “पाऊस सुरू झाला तरी नालेसफाई नसल्याने कडोंमपाचे आठ कोटी पाण्यात”, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांची टीका
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुगणालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून हे रुग्ण येतात. या रुग्णालयावर दिवसेंदिवस रुग्णांचा भार वाढत आहे. असे असतानाच, याठिकाणी रुग्ण उपचारासाठी नेमण्यात आलेले अनेक डाॅक्टर तसेच रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचारी ठरवून दिलेल्या वेळेत उपस्थित राहत नसल्याची बाब यापुर्वीच पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दौऱ्यादरम्यान दिसून आली होती. ठाणे महापालिकेत नुकतेच रुजू झालेले उपायुक्त उमेश बिरारी यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी कळवा रुग्णालयाचा नुकताच पाहाणी दौरा केला. यामध्ये अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी त्यांनी रुग्णालयात हजेरीसाठी बायोमेट्रीक यंत्रे बसविण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. या यंत्रामध्ये डोळ्यांद्वारे ओळख पटवून हजेरीची नोंद केली जाणार आहे. या रुग्णालयात डाॅक्टर, अधिकारी आणि कर्मचारी असा मिळून चारशेच्या आसपास कर्मचारी वर्ग आहे.