ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नियमित हजेरीसाठी नव्याने बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले आहेत. १ जुलैपासून हे मशीन पुन्हा एकदा कार्यरत झाले आहे. या मशीनवरील हजेरीनुसारच कर्मचाऱ्यांचा पगार काढणार असल्याचे परिपत्रकच प्रशासनाने काढले आहे. परिणामी अनियमित येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, या उलट ठरवून दिलेली कामाची वेळ सर्वानी पाळावी, हा यामागचा उद्देश असला तरी तो सफल होतो की नाही, हे येत्या काळात दिसून येईल.

ठाणे महापालिकेतील अनेक विभागांतील कर्मचारी हे आपल्या नियोजित वेळेत जागेवर नसल्याचे पाहायला मिळतात. याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांच्या कामांना विलंब होतो किंवा कर्मचारीच नसल्यामुळे तासन्तास उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांचा वेळ वाया जात असल्याचे अनेकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी काही दिवसांपूर्वी थम्ब इप्रेशन मशीन लावण्यात आले होते. मात्र कामचुकार, हुश्शार कर्मचाऱ्यांनी त्याला च्युईंगम चिटकवून सदरच्या मशीन बंद पाडल्या. मात्र आता नव्याने लावण्यात  आलेल्या या बायोमेट्रिक मशीनमुळे काही दिवस का होईना आपली हजेरी लावण्यासाठी नियमित सकाळी गर्दी असल्याचे पाहावयास मिळते. मात्र हीच शिस्त जर कायम राहिली तर अनेक नागरिकांचा वेळही वाचेल व प्रशासनाची कामेही निश्चितच वेळेत होतील यात शंका नाही.

पालिकेतील अनेक विभागांत कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे निदर्शनास येते. यात सर्वात अग्रेसर सचिव विभाग असल्याची चर्चा नेहमीच पालिकेत रंगलेली असते. या विभागातील कर्मचारी २० ते २५ वर्षांपासून एकाच जागेवर असल्यामुळे येथे अधिकाऱ्यांपेक्षा कर्मचाऱ्यांचाच वरचष्मा असतो. वेळेनंतर कधीही येणे आणि आल्यावर जणू आपण उपकारच केले आहेत, आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही अशी खूणगाठच उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मनाशी बांधली असल्याचे जाणवते. अशा कर्मचाऱ्यांवर विभागाचे प्रमुख कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो. परंतु सगळेजण मूग गिळून गप्प बसलेले दिसतात. परंतु आता या नवीन मशीनचे परिणाम या उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसून येते. ठाणे महापालिकेत असे अनेक विभाग आहेत की जेथे खातेप्रमुखांचा वचक कर्मचाऱ्यांवर नसल्यामुळे कर्मचारी मनाला येईल त्या वेळेत कार्यालयात येतात आणि घरीही जातात. जणू आपण कार्यालयाची गरज म्हणून येतो असाच आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतो.

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे शहरात लोकोपयोगी कामे करून ठाणेकरांची वाहवा मिळविली आहे. आता आयुक्तांनी आपला मोर्चा प्रत्येक विभागाकडे वळविणे गरजेचे आहे. कारण प्रशासनाचा प्रमुख जर काटेकोरपणे काम करत असेल तर कर्मचाऱ्यांनीही त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे. या उलट प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सी.सी. टीव्ही कॅमेरे बसवून ते आपल्या कार्यालयात आयुक्तांनी बसविणे आवश्यक आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना चांगलीच शिस्त लागेल. याबाबत काही कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, अनेकांनी आम्ही वेळेवर येतो, पण उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सर्वाचीच बदनामी होत असल्याचे मत व्यक्त केले.

एकूणच कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी प्रशासन विविध उपाय करत असते, मात्र यासाठी कर्मचाऱ्यांची इच्छाशक्ती आवश्यक आहे. आता नव्याने लावण्यात आलेले बायोमेट्रिक हजेरी मशीनच लेटलतिफ कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार आहे. कारण उशिरा आलेल्यांची जी वेळ नोंदविली जाईल त्यानुसारच महिन्याचा पगार जमा होणार आहे. महापालिकेच्या कामकाजाची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायं. ५.४५ अशी आहे. सकाळी ९.४५ ते १०.१० या वेळेत कर्मचाऱ्यांना हजेरी लावणे बंधनकारक आहे. मात्र आता या मशीनमुळे १० वाजून १० मिनिटांनी लागलेली हजेरी ग्राह्य़ धरली जाणार नसल्याने कर्मचाऱ्यांना वेळेतच यावे लागणार आहे.

Story img Loader