पक्षी गणनेतील निष्कर्ष; अतिक्रमणे, भरावामुळे अधिवास धोक्यात
नवनव्या पक्षी प्रजातींच्या नोंदीमुळे ठाणेकर पक्षीप्रेमी सुखावले असले तरी पक्ष्यांच्या अधिवासावर होत असलेल्या अतिक्रमणांमुळे अनुभवी पक्षी निरीक्षकांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे. शहरातील खाडी परिसरामध्ये विकासकांकडून केल्या जाणाऱ्या भरावाचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मुंब्रा परिसर, साकेत, कशेळी आणि काल्हेरमध्ये डम्परने खाडीमध्ये भराव टाकल्याचे रविवारी पक्षी गणनेत दिसून आले. वेगाने वाढणारा कचरा, प्लास्टिक आणि निर्माल्याचा खच चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
ठाण्यातील ‘होप’ आणि ‘पर्यावरण दक्षता मंच’ या संस्थांनी शहरात पक्षी गणना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पक्ष्यांच्या नव्या प्रजातींची नोंद करण्याबरोबरच त्यांच्या अधिवासामध्ये होणाऱ्या बदलांचा, त्यातील मानवी हस्तक्षेपाचाही मागोवा घेतला जातो. रविवारी पक्षी गणना उपक्रमाच्या निमित्ताने पक्ष्यांची रंजक माहिती टिपताना अधिवासाला असलेला धोकाही पक्षीतज्ज्ञांच्या लक्षात आला. ठाणे खाडीकिनाऱ्यावरील बऱ्याच भागांमध्ये खारफुटी नष्ट बांधकाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास आले. ठाणे पूर्व, मुंब्रा, कळवा, कोलशेत, साकेत, कशेळी आणि काल्हेर या भागात हे प्रकार वाढले आहेत. काही भागांमध्ये खासगी व्यक्तींनी खाडीकिनाऱ्यावर कुंपण घालून तेथून प्रवेश देणे बंद केला आहे. खारफुटी, पाणथळभूमी आणि मिठागरांच्या जागाही बळकावल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी पक्षी निरीक्षणासाठी चांगली ठिकाणे असलेल्या या भागामध्ये आता पाय ठेवण्यासाठीही नाही.
भरावामुळे पक्ष्यांचे खाद्य घटू शकते. हिवाळ्यात येथे दोन लाखांहून अधिक फ्लेमिंगो येतात. खाद्य कमी झाल्यास त्यांचा मृत्यू होण्याचा धोकाही वर्तवण्यात आला आहे, अशी माहिती पक्षी निरीक्षकांनी दिली.
धोक्याची कारणे
* कोपरी परिसरात पाणथळ भूमीवर खासगी ताबा असल्याने पक्षीमित्रांना प्रवेश बंदी
* पक्ष्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या कोपरी परिसरात घनकचरा आणि भराव
* कळवा पुलावरून फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे खाडी बकाल
* साकेत, बाळकुम, कशेळी आणि काल्हेर परिसरात मोठय़ा प्रमाणात भराव
* मुंब्रा आणि पारसिक टेकडीवरील झोपडय़ांमुळे वनक्षेत्र नष्ट
* चौपाटीच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न, मात्र खाडीतील पाण्याच्या स्वच्छतेची कोणतीच काळजी नाही
वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीमुळे पक्ष्यांचे अधिवास सुरक्षित राखणे व्यक्ती किंवा संस्थेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे हा अधिवास राखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. अतिक्रमण होत असलेल्या भागात कायद्याची कडक अंमलबजावणी करून नियंत्रण राखण्याची गरज आहे. एक चांगले पर्यटन क्षेत्र विकसित करून शहराचे पक्षी वैभव वाढवण्याची गरज आहे.
– अविनाश भगत, पक्षी निरीक्षक