उघडय़ा चोचीचे करकोचे परतण्याच्या बेतात; नदी पात्रातील प्रदूषित पाण्यामुळे किडे, नैसर्गिक अन्न नाहीसे
बदलापुरातील उल्हास नदीचे मोठे पात्र हे हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांसाठी माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र शहरी भागांत नदीच्या पात्रात वाढीस लागलेले प्रदूषण, जलपर्णी वनस्पतींची वाढ, औद्योगिक क्षेत्राचे रसायनमिश्रित पाणी यामुळे हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांच्या नैसर्गिक अन्नावर गदा येत आहे. सध्या नदीकिनारी २५-३०च्या संख्येने उत्तरेकडून आलेल्या एशियन ओपन बिल स्टॉर्कचे म्हणजेच उघडय़ा चोचीचा बलाकचे अस्तित्व नदीकिनारी एका सुकलेल्या झाडापुरते मर्यादित आहे. मात्र नदी पात्रातील प्रदूषित पाण्यामुळे किडे, गोगलगायी, गांडुळे हे नैसर्गिक अन्न नाहीसे होत चालल्याने या पक्ष्याला अन्न शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे. त्यामुळे हा उत्तरेकडून आलेला पक्षी आता अन्नाच्या शोधात शहरापासून लांब जाण्याची शक्यता काही पक्षी निरीक्षकांनी वर्तविली आहे.
बदलापूर हे निसर्गाच्या प्रत्येक ठेवीने नटलेले शहर म्हणून एकेकाळी प्रसिद्ध होते. मात्र वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरणाने शहराची ही ओळख नष्ट होत असून दूरवरून येणाऱ्या हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांवर याचा परिणाम होत आहे. बदलापूर शहरात तीन नैसर्गिक तळी असून उल्हास नदी शहरातून वाहते. मात्र हे जलस्रोत मानवी मैल्याने प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम थेट येथे येणाऱ्या परदेशी पाहुण्यांवर होत आहे. बदलापुरातील पक्षी निरीक्षक सचिन दारव्हेकर यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थलांतरित पक्ष्यांपैकी एक एशियन ओपन बिल स्टॉर्क म्हणजेच उघडय़ा चोचीचा बलाक हा हिवाळ्यात उत्तरेकडून मुंबई, दक्षिण प्रांतांत, श्रीलंकेत येतो. त्याच्या चोचीत भेग असल्याने त्याला उघडय़ा चोचीचा बलाक म्हणतात. उथळ पाण्यात हा पक्षी आपले अन्न मिळवत असतो. मात्र जलपर्णी वनस्पती, रासायनिक पाणी यामुळे कीटक, गोगलगायी, गांडुळे हे या पक्ष्याचे नैसर्गिक अन्न संपुष्टात येत चालले आहे. त्यामुळे हे पक्षी आता शहरापासून लांबच्या आपटा धरणावर आपला मुक्काम हलवत आहेत. या भागात सध्या या पक्ष्याचे एक-दोन थवे दिसून आले आहेत. असे दारव्हेकर म्हणाले.
एमआयडीसीचे प्रदूषित पाणी नदीत मिसळत चालल्याने या पक्ष्याचे अन्न धोक्यात आले आहे. त्यामुळे उल्हास नदीवरील हे प्रदूषण न थांबल्यास हा पक्षी भविष्यात बदलापुरात फिरकणारही नाही.
– सचिन दारव्हेकर, पक्षी निरीक्षक