देशातील एक महत्त्वाचे महानगर आणि राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या ठाणे शहराच्या जडणघडणीत अनेक मंडळींचे योगदान आहे. त्यातील एक प्रमुख व्यक्ती म्हणजे डॉ. वा. ना. बेडेकर. डॉ. वा. ना. बेडेकर यांनी विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ठाण्यात विविध शैक्षणिक संस्था उभारल्या आणि ठाणे शहराचे शिक्षण क्षेत्रातील नाव हे अग्रक्रमावर नेले. त्यांनी लावलेल्या रोपटय़ाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेल्याच आठवडय़ात त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा परिचय करून देणारा लेख..
ठाणे शहरात चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करणाऱ्यांमध्ये डॉ. वा. ना. बेडेकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पेशाने ते डॉक्टर होते. त्यामुळे रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देतानाच त्यांनी ठाणेकरांची गरज ओळखून शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी विद्याप्रसारक संस्थेची स्थापना केली. सध्या ही संस्था ठाणे शहरातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखली जाते. ठाण्यातील मुलांना शहराबाहेर उच्च शिक्षणासाठी जावे लागू नये म्हणून त्यांनी शहरात निरनिराळ्या विषय शाखांमधील उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.
डॉ. बेडेकर यांनी १९३५ मध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विद्या प्रसारक मंडळाचे रोपटे लावले. पण शाळेच्या इमारती १९५७ मध्ये उभारण्यात आल्या. नौपाडा भागात पहिली ते सातवी शाळा सुरू केली. त्यावेळी पूर्व प्राथमिकमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतकी जास्त होती की दरवर्षी वर्ग वाढवावे लागत. विद्या प्रसारकच्या वाटचालीत सुरुवातीच्या काळात शिक्षणप्रेमी आणि दानशूर भा. कृ. गोखले यांची बेडेकरांना मोलाची मदत झाली. सुरुवातीला रामकृष्णनगर येथील गोखलेवाडी भागात एका म्हशींच्या गोठय़ात शाळेचे वर्ग भरत असत. १९६९ मध्ये के. ग. जोशी आणि ना. गो. बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. ठाणे शहराच्या खाडीकिनारी दलदलीच्या जागेत अवघ्या सहा महिन्यांत महाविद्यालय उभारले. ठाणे शहरातील हे पहिलेच महाविद्यालय. त्यापूर्वी येथील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईला जावे लागे. विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयामुळे ठाणेकर विद्यार्थ्यांची सोय झाली.
१९७२ मध्ये टीएमसी विधि महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. ठाणे तसेच ठाण्यातील इतर ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला जाण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे १९७३ रोजी डॉ. बेडेकरांनी व्यवस्थापन शिक्षणासाठी व्यवस्थापन विभागाची स्थापना केली. १९७६ मध्ये ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाची शाळा स्थापन करण्यात आली. १९८३ मध्ये तांत्रिक शिक्षणासाठी तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्यात आले. १९९६ रोजी प्रगत अध्ययन क्रेंदाची सुरुवात झाली. २००० रोजी माहिती तंत्रज्ञान विभाग सुरू करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाच्या शाळा-महाविद्यालयीन अभ्यासक्रमांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने डॉ. वा. ना.बेडेकरांचे सुपुत्र डॉ. विजय बेडेकर यांनी कोकण परिसरातील गुहागरजवळील वेळणेश्वर येथे सुमारे ६० एकर जागा खरेदी करून त्यापैकी ३५ एकर जागेवर अत्याधुनिक असे विद्या प्रसारक मंडळाचे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय २०१२ पासून सुरू केलेले आहे. २००८ मध्ये विद्या प्रसारक मंडळाचे परदेशी भाषा अभ्यास केंद्र, २००९ मध्ये लंडन येथे लंडन अॅकॅडमी ऑफ एज्युकेशन अॅण्ड रिसर्चची स्थापना करण्यात आली. २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था, २०१४ मध्ये व्यवसाय आणि कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र,२०१७ मध्ये शैक्षणिक संस्थाचा संयुक्त रोजगार कक्ष यांची स्थापना करण्यात आली. यांसारख्या अनेक शैक्षणिक संस्थांची निर्मिती डॉ. बेडेकरांनी केली. १९७९ मध्ये डॉ. बेडेकरांनी ठाणे भारत सहकारी बँकेची स्थापना केली. सुसंस्कृत समाज निर्माण करण्याच्या ध्येयाने भारावलेल्या डॉ. वा. ना. बेडेकर यांनी अखंड कार्य केले. त्यांच्या कार्यात अनेक सुजाण ठाणेकरांचे अनेक अंगांनी सहकार्य लाभले. बेडेकर कुटुंबाची दुसरी आणि तिसरी पिढीही तितक्याच हिरिरीने हे कार्य पुढे नेत आहे.
हृषीकेश मुळे rushikeshmule24@gmail.com