कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटवाटपावर जाहीर नाराजी होऊ लागली असून पक्षाने अनेक ठिकाणी बंडखोरी केल्याने या बंडखोरांना थोपवायचे तरी कसे असा प्रश्न नेत्यांना पडला आहे. महापालिकेत एकहाती सत्ता आणण्याची भाषा एकीकडे केली जात असताना शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही दिग्गज नगरसेवकांसमोर भाजपने अगदी कच्चे उमेदवार दिल्याची चर्चा रंगली असून यामुळे स्थानिक नेत्यांच्या साटेलोटय़ांचे किस्सेही बाहेर येऊ लागले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली पालिका निवडणूक स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवली आहे. शहरातील प्रत्येक घडामोडींवर मुख्यमंत्र्यांचे बारकाईने लक्ष आहे. असे असताना उमेदवारी याद्यांमध्ये स्थानिक निवडणूक प्रमुख, प्रचारप्रमुखांनी घातलेला गोंधळ, शिवसेना, मनसेच्या उमेदवारांसमोर देण्यात येणारे ‘कच्चे’ उमेदवार, ते करताना होत असलेल्या हालचाली मुख्यमंत्र्यांना दिसत नाहीत का, असे प्रश्न निष्ठावान भाजपच्या गटातून करण्यात येत आहेत. डोंबिवलीतून भाजपला एकही सुशिक्षित उमेदवार का मिळाला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. उमेदवारांची निवड करताना डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे मत विचारात घेण्यात आल्याने संघातील काही जुन्या जाणत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याणमधील बहुतांशी प्रभागांमध्ये खासदार कपिल पाटील यांच्या नजरेत भरलेले उमेदवार भाजपमधून निवडणूक लढवीत आहेत. आमदार नरेंद्र पवार यांच्या एकाही समर्थकाला उमेदवारीत प्राधान्य दिले नसल्याचे सांगण्यात येते. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेपासून दूर राहतील, अशी भाजपमधील निष्ठावान गटाची अटकळ होती. ती फोल ठरली असून पाटील आणि चव्हाण गटाचे उमेदवारांचा यादीवर प्रभाव राहिल्याचे चित्र दिसून येत आहे.\
‘नाराजीचे वृत्त निराधार’
भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने मात्र हे सगळे आरोप आणि टीका फेटाळताना सांगितले, भाजपचे या दोन्ही शहरातील मतदार निश्चित आहेत. आमचा मतदार कोठेही जात नाही. तो काही वेळ नाराज असला तरी एक हाती मतदान करू शकतो. त्यामुळे आम्हाला कोणत्याही टीका आणि नाराजीच्या काळजीचे कारण नाही, असे या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.
कच्चे उमेदवार
शिवमार्केट, रामनगर, कोपर रोड, टिळकनगर या प्रभागांमध्ये भाजपने कच्चे उमेदवार दिले आहेत.
भाजपच्या तिकीटवाटपावर कार्यकर्त्यांची नाराजी
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटवाटपावर जाहीर नाराजी होऊ लागली
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 16-10-2015 at 00:10 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp activists displeasure on allocation of tickets