कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीच्या वेळी सत्ताधारी शिवसेनेला भाजपने आक्रमक होत विरोध केला असून बदलापुरात शिवसेना व भाजपचे संबंध बिघडत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. स्थायी समितीच्या सभेत विरोधी पक्ष असलेल्या भाजप सदस्यांच्या प्रभागातील एकही विकास काम न घेतल्याने तसेच ही सभा बेकायदेशीर असल्याचे सांगत भाजपच्या नगरसेवकांनी काळ्या फिती लावून पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ सत्ताधारी शिवसेनेचा निषेध केला. तसेच स्थायी समितीची सभा बेकायदेशीर असल्याने ती रद्द करावी यासाठी जिल्हाधिकारी, नगरविकास खाते आणि मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले.
कुळगांव-बदलापूर नगरपालिकेत निवडणुकीनंतर शिवसेनेची सत्ता बहुमताच्या जोरावर प्रस्थापित झाली. भाजपनेही त्यांना विकासाच्या मुद्दय़ावर पाठिंबा दर्शवला होता. मात्र पहिल्याच स्थायी समितीच्या सभेत भाजपच्या प्रभागातील एकही काम विषयपत्रिकेवर न घेता दुजाभाव केल्याने भाजपच्या वीस नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी पालिकेच्या प्रवेशद्वारात काळ्या फिती बांधून निषेध केला. अर्थसंकल्पीय तरतूद नसतानाही या समितीत कामांचे विषय घेतले आहेत, अशी तक्रार त्यांनी मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याकडे केली. तसेच ही स्थायी समितीची सभा बरखास्त करावी आणि १७ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील काही ठराव हे नियमबाह्य़ असल्याचे सांगून ती सभादेखील बरखास्त करावी, अशी मागणी भाजपच्या गटनेत्यांनी व सगळ्या नगरसेवकांनी केली आहे. याचे निवेदन या नगरसेवकांनी मुख्याधिकारी देविदास पवार यांना दिले या वेळी दिले. दरम्यान, भाजपच्या या पवित्र्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार
बदलापूर ही स्मार्ट सिटी व्हावी म्हणून आम्ही सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दर्शविला होता. देशात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबद्दल यापूर्वी सूतोवाच केले असल्याने स्मार्ट सिटीसाठी शहराच्या प्रत्येक भागात समान कामे पडणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही असा दुजाभाव खपवून न घेता याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असून या सभा बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचे भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले.