ठाणे महापालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेला कचरा प्रकल्प कार्यान्वित करत पालिका प्रशासनाने दिवा कचराभुमी कायमस्वरुपी बंद केली असून यासाठी आम्हीच प्रयत्न केल्याचा दावा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेकडून करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात एकत्रित सत्तेवर असलेल्या या दोन्ही मित्र पक्षांमध्ये ठाण्यात दिवा कचराभुमी बंद करण्याच्या मुद्द्यावरून श्रेयवाद रंगला असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा >>>राडारोडा उचलण्यासाठी विशेष पथके तयार करा, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश
भंडार्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेला कचरा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याने दिवा कचराभुमी कायमस्वरुपी बंद करण्यात येत असल्याची घोषणा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दोन दिवसांपुर्वी केली. यानंतर बाळासाहेबांची शिवसेनेचे दिव्यातील ज्येष्ठ माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिरवणुक काढून जल्लोष केला होता. तसेच दिवा कचराभुमी बंद करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला असल्याचे सांगत त्यांचे आभाराचे फलकही लावले होते. तर, भाजपचे दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी मात्र भाजपच्या आंदोलनांमुळेच पालिकेने हा निर्णय घेतला असल्याचा दावा केला होता. त्यापाठोपाठ भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही अशाचप्रकारचा दावा केला आहे. दिवा कचराभुमी बंद करण्यासाठी भाजपने आंदोलने केली होती. त्याची दखल घेतली जात नसल्याने कचराभुमीवर येणाऱ्या गाड्याही अडविल्या होत्या. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली होती. त्यावेळी त्यांनी ३० जानेवारी रोजी कचराभुमी बंद करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते.
हेही वाचा >>>ठाण्यात होणार महिला आयपीएल स्पर्धेचा लिलाव?, दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह व्यवस्थापनाकडे एमसीएकडून विचारणा
त्यानुसार पालिकेने ही कचराभुमी बंद केली आहे. केवळ भाजपने केलेले आंदोलन आणि जनतेच्या रेट्यामुळेच हे शक्य झाले आहे, अशी प्रतिक्रीया आमदार केळकर यांनी दिली आहे. या भागात इतर पक्षाचे नगरसेवक होते, त्यांनी कचराभुमी बंदसाठी काही केल्याचे मला दिसून आलेले नाही. त्यामुळे जनतेला माहिती आहे, प्रत्यक्ष कोणी काम केले आणि कोणी आंदोलने केली, असे सांगत त्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेतील माजी नगरसेवकांना टोला लगावला. तर, दिवा कचराभुमी बंद करण्यासाठी कोणी अडथळे आणले आणि कोणी कामे केली, हे जनतेला माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच दिवा कचराभुमी बंद झाली आहे. याठिकाणी आता टाकण्यात आलेला कचरा उचलण्याचेही काम सुरु झाले आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेनेचे माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिली. या कामाचे श्रेय कुणाला घ्यायचे असेल तर त्या वादात मला जायचे नाही. तसेच आमदार संजय केळकर हे आमच्यासोबत युतीत असल्याने त्यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेला उत्तर देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.