कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजपने त्यांचा पक्ष किती वेगळा असल्याचा कित्ता विसरत काही आरोपींनाच उमेदवारी दिल्याचे आता सिद्ध झाले आहे.
बदलापूर पालिकेचा प्रशासकीय इमारत घोटाळा हा राज्यात गाजला होता व तेव्हा एका बडा नेता व माजी नगराध्यक्षाला व तत्कालीन माजी उपनगराध्यक्षाला तुरुंगाची हवा खावी लागली होती. तसेच यांच्यासह पाच सह आरोपी असलेल्यांनादेखील भाजपने उमेदवारी दिल्याने भाजप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीची निविदा न छापताच परस्पर काम दिल्याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तत्कालीन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह पालिकेचे मुख्याधिकारी, नगरसेवक, ठेकेदार यांच्यासह १८ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. या नियोजित प्रशासकीय इमारतीच्या जागेवरूनच वाद उफाळून आला होता. कारण, ही प्रशासकीय जागा म्हणजे शहराच्या मोक्याच्या भागात असलेला दुर्मीळ वनस्पतींचा शहरातील एकमेव हिरवळीचा भाग होता.
त्याला अनेक सामाजिक संघटना, प्राणिमित्र संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे शहरात आधीच विरोध होणाऱ्या या प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याने हा प्रशासकीय इमारत प्रकल्प चर्चेचा विषय ठरला होता. त्यातच आता या प्रकल्पातील आरोपींना तिकीट मिळाल्याने निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा प्रशासकीय इमारत घोटाळा आता चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.
आरोपी आता उमेदवार
प्रशासकीय इमारत घोटाळ्यात अटक झालेले माजी नगराध्यक्ष राम पातकर हे सध्या निवडणूक लढवत नसले, तरी भाजपचे उमेदवार व विद्यमान शहराध्यक्ष मिलिंद नार्वेकर, राजेंद्र घोरपडे, रुचिता घोरपडे, संभाजी शिंदे, मेघा गुरव आदींना भाजपने उमेदवारी दिल्याने हा प्रशासकीय इमारत घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे.
‘शिवसेनेचे षड्यंत्र’
प्रशासकीय इमारत प्रकल्पात अद्याप एक रुपयाही खर्च झाला नसल्याने घोटाळ्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच, हा ठराव सभागृहात त्या वेळी सर्वानुमते मंजूर झाला होता. या ठरावाचे सूचक, अनुमोदक प्रभाकर पाटील, मसूद कोहारी हे होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव मंजुरीला गेला होता. तसेच हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट असून ज्याने हा खटला दाखल केला त्याच्यावर पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाचे चार्जशीट दाखल करण्यावर स्थगिती आली आहे. तसेच हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही पोलिसांच्या विरोधात तक्रारही केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणीच दोषी नसून या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी, अशी भाजपचीच मागणी आहे. यामागे शिवसेनेचे कटकारस्थान असून भाजपच्या नेत्यांची बदनामी करण्याचा हा त्यांचा डाव आहे.

प्रचारावर पावसाचे पाणी
अंबरनाथ : मंगळवारी संध्याकाळी ऐन प्रचाराच्या वेळी वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने उमेदवारांनी मोठय़ा कष्टाने जमवून आणलेल्या प्रचाराच्या थाटमाटावर अक्षरश: पाणी फेरले. बहुतेक प्रभागात बहुरंगी लढती असल्याने बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यासाठी मोक्याची जागा मिळविण्यात उमेदवारांना बरीच यातायात करावी लागली होती. मोठय़ा मुश्किलीने या गोष्टी उमेदवारांनी जमवून आणल्या होत्या. मंगळवारच्या पावसात प्रचाराची ही घडी पार विस्कटून गेलीे. गाळे न मिळाल्याने अनेकांनी मांडवातच प्रचार कार्यालये थाटली होती. त्या मांडवांचेही बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी प्रचाराची मोहीम थांबवून आधी प्रचाराची यंत्रणा दुरुस्त करण्यातच उमेदवारांना धावपळ करावी लागली. संध्याकाऴी पाचच्या सुमारास पडलेल्या पावसाने रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. कारण अंबरनाथमधील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरणाची कामे झाली असली तरी बरीचशी अर्धवट अवस्थेत आहेत. त्यातही काही विभागात भुयारी गटार योजनेचीही कामे सुरू आहेत. अनेक रस्त्यांवर धूळ आणि मातीचे थर आहेत.

Story img Loader