ठाणे : ठाण्यातील भाजपने उत्तर प्रदेश स्थापना दिवस मंगळवारी साजरा केला असून त्यासाठी शहरात चार ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान उत्तर भारतीय बांधवांनी शहरात मिरवणूकही काढली होती. महाराष्ट्रामध्ये उत्तरप्रदेश स्थापना दिवस साजरा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत हा दिवस साजरा करण्यात आल्याचे ठाणे भाजपने म्हटले आहे.
भाजपाच्या राष्ट्रीय अभियानांतर्गत ठाण्यात पक्षाच्या वतीने भारतातील सर्व राज्यांचे स्थापना दिन साजरे करण्यात येत आहेत. त्यानुसार उत्तर प्रदेश स्थापना दिवस मंगळवारी सायंकाळी साजरा करण्यात आल्याचे ठाणे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने उत्तर प्रदेश स्थापना दिन साजरा करण्यात आला. भाजपातर्फे ठाण्यात चार ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उत्तर भारतीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्ताने उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख शैलेश मिश्रा यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचेही अनावरण करण्यात आले. ठाणे शहर भाजपाचे अध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे, माजी नगरसेविका कविता पाटील, कमल चौधरी, किरण मणेरा हे उपस्थित होते.
भाजपाच्या पोखरण मंडळाच्या वतीने माजी नगरसेवक शेरबहादूर सिंह, आशादेवी सिंह, मंडल अध्यक्ष संतोष जायसवाल यांच्या वतीने कवी संमेलन व गुणवंत नागरिकांचा सत्कार करण्यात आला. घोडबंदर रोड मंडळाच्या वतीने रवी सिंह यांनी ब्रह्मांड येथील संमेलन बॅंक्वेट हॉलमध्ये भोजपुरी संगिताचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि ‘लिटी चौखा’ खाद्य पदार्थाचा स्वाद उपस्थितीत रसिकांनी घेतला.
इंदिरानगर मंडळाच्या वतीने माजी नगरसेविका केवलादेवी यादव व राजकुमार यादव यांनी वागळे इस्टेट येथील कर्मवीर रामनयन यादव मैदानात गायक सोनू सिंह, विनय पांडे, नंदिनी तिवारी यांच्या गितांचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी विशेष कार्य केलेल्या मान्यवर नागरिकांचा सत्कार सोहळा पार पडला. दिवा येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख शैलेश मिश्रा यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विद्यासागर दुबे यांनी केले होते. भाजपाच्या ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’चे शहर संयोजक आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी या कार्यक्रमांचे नियोजन केले होते.