कल्याण लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला भाजपा सोबत युती करण्याशिवाय पर्याय नाही. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा कल्याण लोकसभा मतदार संघात नागरिकांच्या आवडीचा आणि विरोधी पक्षाच्या देखील मनातला उमेदवार देईल. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदार संघात कमळच कसे फुलेल यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे वक्त्यव्य भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी कळवा येथे झालेल्या एका पक्ष बैठकीत केले. कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ल्ला मानला जातो. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्त्यव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपाचा पाठिंबा मिळवत एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना ही आपलीच असल्याचा न्यायालयात दावा ही केला आहे. तर शिंदे गटाविरोधात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील कायदेशीर लढा दिला जात आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या सुरु आहेत. येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना फुटी प्रकरणाबाबत निर्णय राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाचा आहे. तसेच येत्या दोन वर्षात देशाच्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदार संघात भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत. या अंतर्गत ते नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षबांधणीचे काम करणार आहेत. यात कल्याण लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. या नियोजन संदर्भात कळवा येथील सिद्धी सभागृहात भाजपा नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत उपक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण आणि संजय केळकर देखील उपस्थित होते.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी देखील कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधला. यावेळी कल्याण लोकसभा मतदार संघात कमळ जिंकवायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच कल्याण लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाची ताकद खूप मोठी आहे. या मतदार संघात कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला भाजपा सोबत युती करण्याशिवाय पर्याय नाही असे देखील ते म्हणाले. कल्याण लोकसभा मतदार संघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ल्ला मानला जातो. या मतदार संघातून २०१४ आणि २०१९ या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे हे भाजपा – शिवसेना युतीत निवडून आले आहेत. या मतदारसंघात भाजपाचा एक मोठा मतदार वर्ग आहे. प्रामुख्याने डोंबिवली शहरात भाजपच्या मतदारांची संख्या अधिक आहे. सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना कुणाची याबाबत न्यायालयीन लढा सुरु आहे. असे असतानाचा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात कमळ निवडून आणण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना रवींद्र चव्हाण यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.
विरोधकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे
एकनाथ शिंदे आणि फडणविस यांचे सरकार येत्या कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामे करतील की विरोधकांना तोंड दाखवायला जाग उरणार नाही. या आधीच्या सरकारने अडीच वर्षाच्या कालावधीत केवळ झोपा काढण्याचे काम केले आहे. मागच्या सरकारने कोणतेही विषय मार्गी लावले नाहीत. अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शनिवारी कळवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत एनडीए महाराष्ट्रातील सर्व जागांवर विजय मिळवेल असेही ते म्हणाले.