डोंबिवलीमधील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी आज ठाण्यातील मेळाव्यात आक्रमक भूमिका घेत ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा नेत्यांनी करताच मेळाव्याला उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला.
मोदी सरकारने नऊ वर्षात राबविलेल्या विविध योजना प्रचार करण्याच्या उद्देशातून भाजपने आज, रविवारी ठाणे लोकसभा मतदार संघात मेळावा आयोजत केला आहे. या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांबरोबरच बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी
ठाणे, कल्याण आणि पालघर हे मतदार संघ भाजपचे होते आणि यापुढेही राहतील, असा दावा आमदार संजय केळकर यांनी मेळाव्यात बोलताना केला. त्यावर उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला.
“फुकटच्या वलग्ना करण्याऐवजी मोदींच्या योजना राबवा”
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत, असा आव काही जण आणत आहेत. अशा फुकटच्या वलग्ना करण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी आणलेल्या योजना तर राबवा, असा टोला केळकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना नाव न घेता लगावला. भारतीय जनता पक्षाशिवाय या जिल्ह्यांमध्ये कोणीही निवडून जाऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
“ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला”
ठाणे लोकसभा मतदारसंघ काही कठीण नाही, या ठिकाणी संघटनात्मक प्रचंड ताकद असून इथे पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे आपल्या विरोधकांना दाखवून द्यायचे आहे की, ठाणे जिल्हा हा पूर्वीपासून ते आतापर्यंत भाजपचाच आहे, असे सांगत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याची आठवण करून दिली.
“आपली अस्तित्वाची लढाई आहे”
आपली अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये भाजपचा कार्यकर्ता कमजोर होता कामा नये. त्यांनी आपली जिद्द सोडता कामा नये. त्यांनी आपली लढाई ही बुथवर लढली पाहिजे. त्यासाठी आपल्यामध्ये पक्षाबद्दल प्रचंड अभिमान असला पाहिजे, असेही ते म्हणाले.