चौकशी प्रक्रियेत सत्ताधारी शिवसेना दबावतंत्राचा वापरीत असल्याचा भाजपचा आरोप

ठाणे : घोडबंदर भागात उभारण्यात आलेल्या ‘थीम पार्क’च्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नेमलेल्या चौकशी समितीवर गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उभे केले जात असतानाच आता या कामाबाबत महापालिका प्रशासनाकडून जे.जे. स्कूल ऑफ आर्टमार्फत सुरू असलेल्या चौकशीत सत्ताधारी शिवसेना दबावतंत्राचा वापर करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, सत्ताधारी शिवसेनेने हे आरोप फेटाळून लावत भाजपच्या सांस्कृतिकमंत्र्यांच्या अखत्यारीत जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येत असल्यामुळे चौकशीवर दबाब टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असले तरी भाजपच्या आरोपामुळे या चौकशीवरही आता प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे चित्र आहे.

घोडबंदर परिसरात महापालिकेच्या माध्यमातून थीम पार्कची उभारणी करण्यात आली असून या पार्कच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध रंगले आहे. थीम पार्कच्या चौकशीसाठी ४८ तासांत चौकशी समिती नेमण्याचा निर्णय सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत घेतला होता. मात्र, अजूनही ही समिती गठित होऊन चौकशी सुरू होऊ शकलेली नाही. असे असले तरी या समितीमार्फत होणाऱ्या चौकशीवर गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उभे केले जात असतानाच आता ही चौकशी समिती नेमण्याच्या मुद्दय़ावरून भाजपने सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटल्यावर धाबे दणाणण्याचे कारण काय आणि लगेचच महापालिका चौकशीसाठी तयार कशी होते, असा प्रश्न भाजपचे गटनेते नारायण पवार आणि मिलिंद पाटणकर यांनी सत्ताधारी शिवसेनेला केला आहे. चौकशीसाठी महापालिका तयार असती आणि सभागृह नेते, स्थायी समिती सभापती यांचा उद्देश निष्कलंक असता तर त्यांनी सर्वसाधारण सभेत ठरल्याप्रमाणे ४८ तासांत चौकशी समितीची स्थापना केली असती, असा आरोपही त्यांनी केला आहे.

जे.जे. स्कूल ऑफ आर्टमार्फत सुरू असलेल्या चौकशीत सत्ताधारी शिवसेना दबावतंत्र वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच चौकशीवरील दबाव काढल्यावर अहवाल काय येतो, ते बघण्याचे आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिले आहे. थीम पार्कच्या भ्रष्टाचाराशी संबंधित सर्वाना सभागृह नेते आणि पालकमंत्री वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या अखत्यारीत जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येते. या विभागाचे मंत्री भाजपचे असल्यामुळे चौकशीवर दबाब टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच भाजपकडे तसे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत.

दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची भूमिका असल्यामुळे कुणालाही वाचविण्याचा प्रयत्न केला जात नाही, असे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

आरोप-प्रत्यारोप

थीम पार्कच्या घोटाळ्यात पालिका अधिकारी दोषी नसून त्यासाठी ठेकेदारच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पार्कच्या पाहणी दौऱ्यादरम्यान केला. भाजपचे नगरसेवक संजय वाघुले हे स्थायी समिती सभापती असताना समितीच्या बैठकीत थीम पार्कच्या कामाला वित्तीय मान्यता देण्यात आली. त्या वेळेस त्यांना हा घोटाळा कळला नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या पार्कचे काम सव्वादोन कोटी रुपयांमध्ये होते, असे आमदार केळकर यांचे म्हणणे असेल तर त्यांनी तेवढय़ा खर्चात हे काम करून घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, सरनाईकांचे आव्हान स्वीकारत अडीच कोटी रुपयांमध्ये पार्क करून दाखवले तर ते पालिकेत १६ कोटी रुपये भरतील का, असा प्रतिप्रश्न भाजपचे नगरसेवक नारायण पवार आणि मिलिंद पाटणकर यांनी केला आहे.