ठाणे : ठाणे शहराच्या विविध भागात गेल्या तीन दिवसांपासून कचरा उचलला गेला नसून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहेत. या कचराकोंडीच्या प्रश्नासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यामध्ये तोडगा काढून ठाणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचऱ्याचे ढीग साचले असून येथील दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच येथे दोनदा आग लागल्याने परिसरात सर्वत्र धूर पसरून नागरिकांना त्रास झाला. यामुळे स्थानिक नागरिकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षाने येथे कचरा आणण्यास विरोध केला.

या विरोधानंतर ठाणे महापालिकेने शहरातील कचरा भिवंडी येथील आतकोली भागातील कचराभुमीवर नेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, ठाणे ते आतकोली अंतर ३७ किलोमीटर इतके असल्यामुळे शहरातील घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून शहरात घंटागाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे गृहसंकुलाच्या बाहेर तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा साठल्याचे चित्र दिसून येत आहे.

हा कचरा अतिरिक्त गाड्या लावून उचलण्यात येत असला तरी घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग अद्यापही दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील कचराकोंडी प्रश्नासंदर्भात महापालिका आयुक्तांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी. तसेच त्यामध्ये तोडगा काढून ठाणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

चौकट गेल्या ४० वर्षांत कचराभुमी उभारण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले. सध्या ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झाली आहे. त्यामुळे भविष्यात कचरा निर्मूलनाचा प्रश्न आणखी भीषण स्वरुप धारण करेल. त्यामुळे आतापासून उपाय शोधण्यासाठी सुरुवात करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांची सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी वाघुले यांनी केली आहे.