ठाणे : अगामी लोकसभा निवडणुकीत ठाण्याची जागा मिळावी यासाठी शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच, आता शहरात शिवसेनेने उभारलेल्या कंटेनर शाखांवरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. महापालिकेची जागा बळकावण्यासाठी बेकायदा कंटेनर शाखा उभारण्यात आल्याचा आरोप करत ती तात्काळ हटविण्याची मागणी भाजपने पालिका आयुक्तांकडे केली आहे. तर, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या कंटेनंर शाखांच्या माध्यमातून कोणतेही बेकायदा बांधकाम करण्यात आलेलेे नसल्याचा दावा करत नागरिकांचा त्यास विरोध असेल त्या हटविण्यात येतील, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
शिवसेनेतील उठावानंतर पक्षात उभी फुट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात मोठे समर्थन मिळाले. जुन्या शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाले. वाद टाळण्यासाठी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी कंटेनर शाखांची उभारणी केली. परंतु रस्ते आणि पदपथ अडवून कंटेनर शाखा उभारण्यात आल्याने त्यावरून विरोधी पक्षाने टिका केली होती. त्यास शिवसेनेनेही प्रतिउत्तर दिले होते. यानंतर हा वाद काहीसा निवळल्याचे चित्र असतानाच, भाजपने या वादात उडी घेऊन मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या कंटेनर शाखांवरच आक्षेप घेतला आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आल्याचा आरोप केला होता. २०२१ साली याच जागेवर कपाऊंड टाकुन लोकोपयोगी मुलभूत सोईसुविधांसाठी वापर करण्याची सूचना केली होती.
हेही वाचा >>>देशातील हुकूमशाही उलथविण्यासाठी सज्ज रहा; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डोंबिवलीत लावलेल्या फलकांमुळे खळबळ
महापालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावुन अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते. तरीही २४ जानेवरी रोजी याठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवुन २७ जानेवारी रोजी त्या कंटेनरवर झेंडा आणि फलक झळकवण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तत्काळ फोन करून कारवाईचे आदेश दिल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. राजरोसपणे अतिक्रमण करण्याची इतकी हिंमत होतेच कशी ? असा प्रश्न उपस्थित करत हा कंटेनर तत्काळ हटवावा अन्यथा त्याशेजारीच प्रतिकात्मक दोन कार्यालये थाटण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यावर आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ती शाखा माझ्या मतदार संघात नसून आमदार केळकर यांच्या मतदार संघात आहे. त्याठिकाणी पत्रे लावून किंवा बांधकाम करून शाखा उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे तिथे कोणतेही अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले नाही. नागरिकांच्या समस्या सोडविता याव्यात यासाठी नागरिकांच्या सोयीकरिता ही कंटेनर शाखा उभारण्यात आलेली आहे. परंतु नागरिकांना त्याचा अडथळा किंवा त्रास होत असेल तर ती हटविण्याबाबत संबंधित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगेन, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांबाबत विविध भागातील नागरिकांनी सचित्र केलेल्या तक्रारींचा लेखाजोखा मांडत आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना जाब विचारला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामांवर कारवाई होईल. शिवाय बांधकामांना पाठिशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सभागृहात सांगितले होते. ही घोषणा हवेत विरता कामा नये, अशा अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्षात कारवाई होणे गरजेचे असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.