‘सस्ता रोए बार बार, महंगा रोए एक बार’ अशी म्हण आहे.  मात्र स्वस्त वस्तूंसाठी आजही उल्हासनगरचा पर्याय निवडतात. प्रथमदर्शी सुंदर, आकर्षक, मात्र त्याची गुणवत्ता आणि दर्जा सुमार अशा अनेक गोष्टी उल्हासनगरमध्ये सहज उपलब्ध होतात. या शहराचे राजकारणही असेच. वारा येईल, असे पाठ देणारे. उल्हासनगरचे व्यक्तिकेंद्रित राजकारण अशाच एका वळणावर येऊन ठेपले असून साई पक्षाच्या भरवशावर सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनात अखेरच्या क्षणापर्यंत धाकधूक राहणार, असे दिसते आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मात्र सत्तास्थापनेसाठी निकालानंतरही महिना असल्याने राजकीय उलथापालथ सावकाश झाली. यंदाची निवडणूक अनेक कारणांनी लक्षवेधी ठरली. एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले कलानी आणि आयलानी कुटुंबीय सत्तेसाठी एकत्र आले. ज्या भाजपची ताकद दोन आकडय़ांपर्यंत कधी पोहोचू शकली नव्हती, त्यांनी थेट ३२ चा आकडा पार केला. त्यात मुळात निम्म्याहून अधिक ताकद कलानी कुटुंबाची होती यात शंका नाही. टीम ओमी कलानीची ताकद भाजपपासून वेगळी केल्यास भाजपने या निवडणुकीत अवघ्या एका जागेची कमाई केली असेच म्हणावे लागेल. मात्र टीम ओमी कलानीही भाजपच्याच चिन्हावर लढल्याने सर्व श्रेय भाजपलाच जाते. मात्र सत्तेचे गणित काही त्यांना एकहाती साधता आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा किंगमेकर म्हणून ओळख मिळवलेला स्थानिक अशा साई पक्षाच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. निवडणूक काळात याच साई पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा भाजपने लावला होता, असा आरोप खुद्द साई पक्षाचे अध्यक्ष जीवन ईदनानी यांनीच केला होता. इतकेच नव्हे तर मतदानाच्या दिवशी भाजप कशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करत आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी साई पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना कशा प्रकारे बेदम मारहाण केली होती हे ईदनानी ओरडून सांगत होते. ज्यांच्यासोबत कलानी त्यांच्यासोबत कधीही जाणे नाही, हा इदनानी यांचा तोरा मात्र निकालानंतर अवघ्या २४ तासांतच गळून पडला. मुख्यमंत्र्यांची भेट घेत स्थानिक भाजपचे नेते शहराचा विकास कशा प्रकारे करू शकतात याचा त्यांना मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी साक्षात्कार झाला. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना पक्षातूनही विरोध झाला, तो अद्यापही काही अंशी सुरू आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे हेही टिकाऊ  निघाले नाहीत.

मुळात साई पक्षाची निवडणुकीतील वाटचाल ही भाजपविरोधामुळेच होती. कलंकित नेत्यांना पक्षात घेणे असो वा सत्तेत राहूनही शहराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप असो, अशा अनेक मुद्दय़ांवर प्रचार करत साई पक्षाने शहरात भाजपविरोधी वातावरण तयार केले होते. याच काळात त्यांना रोखण्यासाठी भाजपनेही आटोकाट प्रयत्न केले. मात्र तरीही साई पक्षाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तीन जागी अधिक यश मिळवत आपल्या जागा ११ पर्यंत नेल्या. मुळात या जागा वाढण्यात भाजपविरोधच महत्त्वाचा ठरला. साई पक्षाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी निवडून आले, त्या ठिकाणी थेट लढाई भाजपशीच होती. त्यामुळे सुरुवातीला भाजपविरोध करत मिळवलेला मतदारांचा विश्वास साई पक्षाने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी गमावला आहे. याबाबत अनेक नागरिक आपल्या शहराचा पक्ष म्हणून साई पक्षाकडे पाहतात. मात्र भाजपला समर्थन देण्याच्या निर्णयाने अशा मतदारांना मोठा धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि साई पक्षाचा थेट सामना झाला होता. मनोज सयानी, आकाश चक्रवर्ती अशा भाजपच्या दिग्गजांना धक्का देण्यात साई पक्षाचाच मोठा हात होता. त्यामुळे किंगमेकर ठरलेल्या साई पक्षाच्या निर्णयाकडे उल्हासनगर शहरासह अवघ्या जिल्ह्य़ाचे लक्ष लागले होते.

पालिका निकालांच्या दुसऱ्याच दिवशी साई पक्षाचे ईदनानी यांनी भाजपला समर्थन जाहीर केले होते. त्या घटनेला आता एक महिना उलटला आहे. या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सत्तास्थापनेसाठी अखेरच्या क्षणी सक्रिय झालेल्या शिवसेनेने मात्र साई पक्षाला आणि पर्यायाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. साई पक्षाच्या ११ नगरसेवकांच्या गटाची मान्यता पक्षाची घटना न सादर केल्याने रद्द करण्याचा निर्णय नुकताच कोकण विभागीय आयुक्तांनी जाहीर केला आहे. त्यामुळे साई पक्ष गट म्हणून पालिका सभागृहात नसेल. त्याचा पुरेपूर फायदा घेण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली असून या गट रद्द करण्याच्या कारस्थानात शिवसेनाच आग्रही असल्याचे बोलले जाते, कारण महापौरपदाचा अर्ज भरण्याच्या दिवशीच साई पक्षाच्या नगरसेवकांना आपल्याकडे फिरवून त्यांना अर्ज भरण्यासाठी तयार करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न फसला होता. ज्या व्यक्तीच्या घरात हे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते, त्या साई पक्ष समर्थकाला आता शिवसेनेने स्वीकृत नगरसेवकपद देऊ  केले आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेनेने दाखवून दिले आहे. त्यात साई वगळता इतर सर्वपक्षीयांची मोट बांधण्यात शिवसेना यशस्वी ठरत असून आता साई पक्षाच्या काही नगरसेवकांना गळाला लावल्यास शिवसेनेची सत्तेची गणिते जुळतील. मात्र या काळात सुरुवातीपासूनच भाजप कायदेविषयक धोरणांमध्ये कमजोर पडल्याचे समोर आले आहे. ओमी कलानी यांचे तीन अपत्यांचे प्रकरण असो वा साई पक्षाचे गट रद्द करण्याचे प्रकरण असो, भाजपने या बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. त्याच वेळी शिवसेना आणि मित्रपक्षाने याचबाबत सतर्कता ठेवून भाजपच्या अडचणींमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न कायम ठेवले आहेत.

दरम्यान, चांगल्या वस्तूंची प्रतिकृती तयार करण्यात अग्रेसर असणाऱ्या शहरातील वस्तू टिकत नसल्या तरी किमान व्यक्तिकेंद्रित राजकारणाच्या शहरात किमान शब्द टिकावा आणि विश्वासार्हता वाढावी अशीच अपेक्षा येत्या महापौरपदाच्या निवडणुकीकडून शहरवासीयांना आहे.

Story img Loader