जयेश सामंत, ठाणे
ठाणे जिल्ह्यात कोणत्याही स्थितीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून जागा मिळवण्याच्या जिद्दीने पेटलेल्या शिवसेनेला यंदाही भाजपला मागे टाकणे शक्य झालेले नाही. महायुतीतील हे दोन घटक पक्ष यंदा जिल्ह्यात प्रत्येकी नऊ जागा लढवत होते. राष्ट्रवादीला लागलेली गळती आणि कॉंग्रेसची दयनीय अवस्था पाहता युतीला जिल्ह्यात मोठे यश मिळेल हे स्पष्टच होते. त्यामुळे पहिल्या क्रमांकाचा पक्ष कोण ठरणार, अशी सुप्त स्पर्धाच शिवसेना-भाजपमध्ये सुरू होती. जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना क्रमांक एकचा पक्ष आहे. या निकालांची पुनरावृत्ती विधानसभेत करणे मात्र शिवसेनेला शक्य झालेले नाही. नऊपैकी चार जागांवर झालेला पराभव शिवसेना नेत्यांना जिव्हारी लागला आहे.
भाजपने मात्र आठ जागांवर विजय मिळविलाच शिवाय मीरा-भाईदर विधानसभा मतदारसंघातही पक्षाच्या बंडखोर उमेदवार विजयी झाल्याने शंभर टक्के यशाच्या आनंदात या पक्षाचे नेते आहेत. पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का देत १८ पैकी आठ जागांवर विजय मिळविला होता. तेव्हापासून जिल्ह्यात या दोन पक्षांमध्ये रंगतदार सामना पहायला मिळत आहे. कपील पाटील, किसन कथोरे यांच्यापाठोपाठ गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी भाजपसोबत जाणे पसंत केल्याने जिल्ह्यात या पक्षाची ताकद वाढली. तरीही पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने आपणच मोठा भाऊ असल्याप्रमाणे जिल्ह्यात शिवसेना नेत्यांचे वागणे राहिले आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेने भाजपला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे समसमान जागा वाटप व्हावे, असा पालकमंत्री शिंदे यांचा आग्रह होता. मुख्यमंत्र्यांनीही तो मान्य केल्याने गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळणार यावरुन या दोन पक्षांमध्येच स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेतून दोन पक्षांमध्ये शह-काटशहाचे राजकारणही पाहायला मिळाले.
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचा निर्णय अंतिम असतो. मात्र, कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या एका नगरसेवकाने भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात बंडखोरी केली आणि तेथूनही ही स्पर्धा टोकाला पोहोचली. शिवसेनेच्या या बंडखोरीला प्रत्युत्तर म्हणून कल्याण पश्चिमेतून भाजपच्या नरेंद्र पवार यांनी बंडखोरी केली. विशेष म्हणजे, पक्षाने इतर बंडखोरांवर कारवाईचा निर्णय घेतला, मात्र या यादीतून पवार यांना वगळल्याने शिवसेनेतही योग्य तो संदेश गेला. त्याचा परिणाम म्हणून ठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा एक मोठा गट मनसेला गुप्तपणे मदत करताना दिसला तर कल्याण ग्रामीणमध्ये भाजपचे कार्यकर्ते मनसेच्या राजू पाटील यांच्यामागे उभे राहीले. या सर्वाचा फटका मात्र शिवसेनेला बसलेला दिसतो. कल्याण ग्रामीण, शहापूर, भिवंडी पूर्व, कळवा मुंब्रा या चार मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला. त्यापैकी शहापूरच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला स्वपक्षात आणून दौलत दरोडा यांच्यासारख्या जुन्या निष्ठावंताला तिकीट नाकारण्याचा प्रयोग शिवसेनेच्या अंगलट आला. कल्याण ग्रामीण मतदारसंघातही शिवसेनेने विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना आधी उमेदवारी जाहीर केली आणि शेवटच्या क्षणी ती बदलली. येथे कॉंग्रेस, राष्ट्रवादीने उमेदवार उभा करायचा नाही अशी खेळी केली. शिवाय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची साथ लाभल्याने मनसेचे इंजिन वेगाने धावले आणि शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला. कळवा-मुंब्य्रात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड निवडून येतील हे स्पष्टच होते. तेथेही शिवसेनेने स्थानिक शिवसैनिकाला संधी दिली नाही. भिवंडी पूर्व मतदारसंघात विद्यमान आमदार रुपेश म्हात्रे यांच्याविरोधात असलेली नाराजी समाजवादी पक्षाच्या पथ्यावर पडली. काँग्रेस, राष्ट्रवादीची जिल्ह्य़ातील एकंदर अवस्था बघता पाच जागांवर इतर पक्षांचा विजय होणे हे या दोन्ही पक्षांसाठी समाधानाची बाब म्हणावी असेच चित्र आहे.