भाजपच्या मुंबईतील सर्वेक्षणातील निष्कर्ष; शंभरावर जागांचा अंदाज
मुंबईत स्वबळावर लढल्यास भाजपला सर्वाधिक फायदा होईल आणि शंभरी पार करून पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून यश मिळू शकते, असे पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. युती केल्यास त्याचा लाभ शिवसेनेला अधिक होईल व महापौर त्यांचा होईल. त्यामुळे भाजपचाच महापौर सत्तेवर यावा, असा चंग बांधून मुंबईतील निवडणूक स्वबळावर लढण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असून अंतिम निर्णय मात्र ऐनवेळी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेबद्दल प्रचंड राग असून मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून सत्ता हिसकावून घेण्याची त्यांची रणनीती आहे. पण तरीही मुख्यमंत्री फडणवीस यांना युतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि अन्य अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याने राज्यातील वातावरण भाजपला अनुकूल होत असून नगरपालिका निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे पक्षाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात भाजप स्वबळावर लढल्यास शंभरी पार करता येईल, असे निष्कर्ष आले आहेत. अगदी कमीतकमी म्हणजे ८५ जागा तरी निश्चित मिळविता येतील, अशी खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत असल्याने शिवसेनेशी जागावाटपात नमते घेऊन १०० पर्यंत जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा सरळ लढत द्यावी, असा भाजपच्या बहुतांश नेत्यांचा कल आहे.
स्वबळावर लढल्यास प्रचारात राळ उडेल आणि शिवसेना-भाजपमधील संबंध कमालीचे बिघडतील. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेची मुख्यमंत्री फडणवीस यांना काहीशी चिंता असली तरी स्वबळावर लढून निवडणुकांचे निकाल पाहून पुढची रणनीती ठरविता येईल. जर स्वबळावर लढले नाही, तर जागावाटपात शिवसेनेचा वरचष्मा सहन करावा लागेल आणि महापौर शिवसेनेचाच स्वीकारावा लागेल. सर्व निवडणुकांमध्ये भाजपची घोडदौड सुरू असताना सरकार टिकविण्याच्या भीतीपोटी शिवसेनेपुढे नमते घेऊन तडजोड केली, असा ठपकाही आपल्यावर येऊ नये, याचीही काळजी मुख्यमंत्री फडणवीस यांना आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे नमते घेऊन १००-१०५ जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा स्वबळावर लढून निवडणूक निकालानुसार सत्तेसाठीची पुढील रणनीती आखण्याचा मार्ग अधिक योग्य आहे. त्यातून सर्व महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही कार्यकर्त्यांना अधिक उत्साहाने काम करता येईल. शिवसेनेपुढे नमते घेतल्यास त्याचा कार्यकर्त्यांमध्येही चुकीचा संदेश जाईल, अशी भीतीही नेत्यांना वाटत आहे.
युती केल्यास शिवसेनेला अधिक लाभ होऊन जास्त जागा लढविल्याने भाजपपेक्षा अधिक यश मिळेल व महापौर त्यांचा होईल. विधानसभा निवडणुकीतही युती केली असती तर भाजपकडे मुख्यमंत्रिपद आले नसते. भाजपचा महापौरजिंकून यावा, यासाठी स्वबळ अजमावून पाहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा दबाव आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी व अध्यक्ष शहा यांच्याशी चर्चा करून फडणवीस हे अंतिम निर्णय घेतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.