ठाणे – शहरात मराठी नववर्षानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाच्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीसाठी भारतीय जनता पक्ष आग्रही असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी या यात्रेत फडणवीस यांनी कधीही हजेरी लावली नव्हती. परंतू, यंदा प्रथमच फडणवीस या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने स्वागत यात्रेच्या बैठकीत दिली. त्यामुळे आता, शहरात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त दरवर्षी जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. ठाणे आणि डोंबिवली हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये मोठ्या स्वागत यात्रा निघतात. या यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश दिले जातात. ठाणे शहरात श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे स्वागतयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा या स्वागत यात्रेचे २५ वे वर्षे आहे. त्यामुळे न्यासातर्फे चार महिन्याआधीपासून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी यासंदर्भात बैठक पार पडत असून या बैठकीत शहरातील विविध संस्था सहभागी होतात.

कोणत्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला जाईल याचे नियोजन या बैठकीत केले जाते. या सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वागत यात्रेच्या बैठकीला आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले, ठाणे शहरात गेली २५ वर्षे ही यात्रा निघत आहे. ही केवळी यात्रा नसून संस्कृती, परंपरा आणि धर्माची एक चळवळ आहे. त्यामुळे या यात्रेची ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्यांनी देखील या यात्रेत सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा सल्लाही डावखरे यांनी आयोजकांना दिला. तसेच यंदा यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्षे आहे. या यात्रेविषयी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असून त्यांना या यात्रेत सहभागी होण्याची विनंती केली आहे. यासाठी फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली असल्याचे  भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

Story img Loader