मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला मात्र टाळला
कल्याण डोंबिवली शहरात विकासाची कामे झाली आहेत. या शहरांनी स्मार्ट सिटीचे काही निकष पूर्ण केले म्हणूनच स्मार्ट सिटीसाठी निवडण्यात आली. स्मार्ट सिटीचा आता जो गाजावाजा करण्यात येत आहे, तो ठिक आहे. पण हा गाजावाजा न करता या शहरांना रस्ते, दिवाबत्ती, पाणी, अभ्यासिका यासारख्या सुविधा प्राधान्याने मिळायला हव्यात, असे सांगत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी भाजपचा नामोल्लेख टाळून स्मार्ट सिटीच्या गाजावाज्यावर ताशेरे ओढले.
भाजपच्या नेत्यांकडून शिवसेनेने इतकी वर्ष शहरासाठी काय केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपला आताच या समस्या कशा दिसू लागल्या. इतकी वर्ष हे आमच्यासोबत सत्तेत आहेत. तेव्हा भाजपचे नेते झोपले होते का, असा सवाल िशदे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. शिवसेनेचा कारभार योग्य वाटत नव्हता तर भाजपचे नगरसेवक सत्तेतून बाहेर का पडले नाहीत, असेही ते म्हणाले. सत्तेत राहून यांनी स्थायी समिती सभापती, उप-महापौर यासारखी पदे भुषवायची आणि नंतर टीका करत फिरायचे हे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र िशदे यांनी थेट टीका करणे टाळले.
२७ गावांचा सर्वांगीण विकास महापालिकेच्या माध्यमातूनच होईल. शिवसेनेने पहिल्या पासून ही गावे पालिकेत आली पाहिजेत, अशी भूमिका ठेवली आहे. अन्य पक्षांनी भूमिका बदलल्या. पण सेनेने भूमिका बदलली नाही. गावची जनता ही सेनेच्या पाठीशी आहे. त्यांना विकास हवा आहे. २७ गावांमध्ये कोणी कितीही वल्गना केल्या असल्या तरी ग्रामस्थांना काय हवे आहे हे येत्या काळात स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ६५ हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनसेच्या नगरसेवकांनी काय केले?
‘शिवसेना डरपोक आहे’ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपांवर आपणास काहीही म्हणायचे नाही. मनसेच्या २८ नगरसेवकांनी पाच वर्षांत काय कामे केली. विकासाचा एखादा फलक त्यांनी प्रभागात लावून दाखवावा, असे प्रति आव्हान शिंदे यांनी दिले. केवळ शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपसह अन्य पक्षांनी दळभद्री, अभद्र युती केली आहे. यांना जनता चांगलाच धडा शिकवील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.