BJP Leader Girish Mahajan met Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत उद्यापर्यंत ठीक होईल आणि त्यानंतर ते बैठक देखील घेतील, असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले. युतीमध्ये सारे काही अलबेल असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> ठाणे जिल्हा रुग्णालयात एकच दिवशी १०० बालकांवर विविध यशस्वी शस्त्रक्रिया !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी, त्यांची प्रकृती पुर्णपणे बरी झालेली नाही. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली असून यामुळे त्यांच्या सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच त्यांना भेटण्यासाठी आलेल्या पक्षातील आमदारांनाही ते भेटले नव्हते. दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, असे महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तीन ते चार दिवसांपासून मी वेळ मागत होतो, परंतु ते गावी निघून गेल्यामुळे माझा त्याचं संपर्क झाला नाही. ठाण्यात असल्यामुळे इथेच त्यांना भेटण्यासाठी आलो. युतीमध्ये सारे काही अलबेल आहे.
हेही वाचा >>> गुजरातच्या लबाडांचे लक्ष आता ठाणे, मुंबई महापालिकेवर; शिवसेना नेते विनायक राऊत
आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांचे मत प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. उद्यापर्यंत त्यांची तब्बेत ठीक होईल आणि त्यानंतर ते बैठक देखील घेतील, असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळबाबत माझी अशी कोणतेही चर्चा झाली नाही, हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्यांना अजूनही सलाईन लावलेले आहे. परंतु उद्यापर्यंत ते ठीक होतील आणि स्वतः सगळ्या गोष्टींचे लीड घेतील. आम्ही सगळे एकत्र आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शपथ विधीची जागा पाहण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे अचानक गेले होते. त्या संदर्भात कुणाशी समन्वय झाला नाही हे खर आहे. उद्या आम्ही एकत्रित जाणार आहोत. तसेच ५ तारखेच शपथ विधी दिमाखदार होईल, असेही ते म्हणाले.