कल्याण: मुरबाड विधानसभेतील भाजप आमदार किसन कथोरे यांची भाजपमधून हकालपट्टी करावी. कथोरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप तथा महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याऐवजी उघडपणे विरोधात काम केले. याची सर्व माहिती आपल्याकडे आहे. पक्षविरोधी काम केल्यामुळे आमदार कथोरे यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांंनी हे पत्र दिल्याने दोन पाटील विरुध्द कथोरे असा सामना येत्या काळात रंगण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन वर्षापासून कपील पाटील आणि किसन कथोरे यांच्यात धुसफूस सुरू आहे. भाजप नेत्यांनी वेळोवेळी या धुसफूशीवर पांघरूण घालून हा वाद वाढणार नाही याची काळजी घेतली. आता माजी मंत्री जगन्नाथ पाटील या ज्येष्ठ नेत्याने कथोरे यांच्या विरुध्द प्रदेश नेत्यांना कथोरे यांच्या हकालपट्टीची मागणी केल्याने भाजपच्या ठाणे जिल्ह्यात मोठी बंडाळी होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी कायम; बंदी असतानाही अवजड वाहनांच्या घुसखोरीने एक किलोमीटरसाठी दोन तास
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विषय उफाळून आल्याने कथोरे समर्थक प्रसंगी मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीच कथोरे समर्थकांनी कपील पाटील यांच्या त्रासाला कंटाळून स्वतंत्र भूमिका घेण्याची गळ कथोरे यांना घातली होती. त्यावेळी प्रदेश नेत्यांनी कथोरे यांना सबुरीचा सल्ला दिला होता. प्रदेश नेत्यांच्या एकत्रित बैठकीत कपील पाटील यांनी आपले आक्षेप स्पष्ट मांडले होते. कथोरे यांनी यावेळी कोणताही खुलासा केला नव्हता, असे जगन्नाथ पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
कपील पाटील यांच्या विजयासाठी आपल्या सांगण्यावरून मुरबाड मतदारसंघात मेळावे झाले. तेथे कथोरे उपस्थित होते. त्यानंतर कथोरे यांनी पडद्यामागून आपल्या कार्यकर्त्यांना जेथे आगरी समाजाची गावे आहेत तेथे महाविकास आघाडीचे बाळ्या मामा आणि जेथे कुणबी समाजाची गावे आहेत तेथे नीलेश सांबरे यांना मत देण्याचे फर्मान सोडले. अशा १०० कार्यकर्त्यांची यादी आपल्याकडे आहे. भाजपच्या विजयासाठी वरिष्ठांकडून आदेश असताना कथोरे यांनी त्या आदेशाला काडीचीही किमत दिली नाही. प्रदेशाध्यक्षांच्या प्रयत्नांना धुडकावून लावले, असा आक्षेप जगन्नाथ पाटील यांनी पत्रात घेतला आहे. कथोरे यांच्या या कृतीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खूप असंतोष आहे. पक्षाच्या विरोधात आणि कपील पाटील यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या किसन कथोरे यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा : जुन्या ठाण्यातील पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक झालेल्या कुटुंबियांची बैठक
आपण रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष याविषयी बोलून सविस्तर माहिती दिली आहे. इतर भाजप नेत्यांना याविषयची पत्रे पाठवून किसन कथोरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
जगन्नाथ पाटील (भाजप नेते)
या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. केवळ गैरसमज आणि आकसापोटी मला लक्ष्य बनवले जात आहे. मी भाजपचा कार्यकर्ता असून पक्षवाढीसाठी सातत्याने काम करीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट होईलच.
आमदार किसन कथोरे (मुरबाड)