डोंबिवली : डोंबिवली म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला. उच्चशिक्षित कट्टर संघ स्वयंसेवकांचे ठिकाण म्हणजे डोंबिवली. अशा वर्तुळात रवींद्र चव्हाण यांना सहजासहजी प्रवेश मिळणे कठीणच होते. मात्र सुरुवातीला ‘हरकाम्या’ कार्यकर्ता, नंतर आक्रमक तरुण, त्यानंतर ‘कार्य’तत्पर नगरसेवक, त्यानंतर सांस्कृतिक कामांना आर्थिक पाठबळ देणारा नेता आणि नंतर भाजपच्या राज्यातील मुख्य नेत्यांचा निकटवर्तीय असा प्रवास करत रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदावर पकड मिळवली. अलीकडे यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची दूरस्थ शिक्षण विभागाची पदवी जवळ घेतली असली, तरी रवींद्र चव्हाण यांचे सुरुवातीचे शिक्षण बारावीपर्यंतचे. नोकरी, व्यवसाय नसल्याने सुरुवातीच्या काळात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींमध्ये ऊठबस. त्यातून काही गुन्हेही दाखल झाले. पण कालांतराने ते पुसूनही निघाले…

साधारण २५ वर्षांपूर्वी भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यावेळच्या शिस्तप्रिय आणि तत्त्वनिष्ठ भाजपच्या मंडळींमध्ये आक्रमक आणि समर्पित कार्यकर्ता म्हणून् ते पुढे येऊ लागले. त्यावेळी विनोद तावडे यांच्यासारख्या राज्यस्तरीय नेते मंडळींनी चव्हाण यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सुरुवातीला नाके मुरडणारी मंडळीही झुकू लागली. त्यामुळे संघ, भाजपनिष्ठांचा प्रभाग असलेल्या सावरकर रोडमधून ते नगरसेवक बनले.

हेही वाचा >>> VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा

आनंद दिघे यांनी रुजवलेल्या आणि एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांनी वाढवलेल्या शिवसेनेचेच तेव्हा भाजपसमोर मोठे आव्हान होते. त्या शिवसेनेच्या ‘अरे’ला ‘का रे’ करणाऱ्या माणसाची भाजपला गरज होतीच. ती चव्हाण यांनी पूर्ण केली. त्यामुळे अनेक जुने, कर्तव्यदक्ष नगरसेवक असताना पक्षाने रवींद्र चव्हाणांना स्थायी समितीचे सभापतीपद दिले. तेथूनच त्यांच्या ‘उत्कर्षा’चा काळ सुरू झाला.

विकास निधीचे लक्ष्मी मंथन

याच कालावधीत जवाहरलाल नेहरू अभियानातून काँग्रेस सरकारने पालिकांना विविध विकासकामांना कोट्यवधीचा निधी दिला. शहरी झोपडीवासीयांना हक्काचे घर म्हणून शहरी गरिबांसाठी बीएसयूपी योजना आणली. निधीचा महापूर पालिकेत धडकल्यावर या कामांचे नियंत्रण आणि नियोजन स्थायी समितीचे सभापती म्हणून अपसूक चव्हाण यांच्याकडे आले. शहर विकासाच्या नावाखाली कोट्यवधीचे आठ बीओटी प्रकल्प राबविण्याची टूम निघाली. त्या प्रकल्पांच्या व्यवस्थापनाचा बोऱ्या वाजला. पण निधीचा ‘वापर’ आणि ‘हस्तांतर’ योग्य ठिकाणी झाले. बीएसयूपी योजनेत तीन कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा गुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्यात पालिका अधिकारी, ठेकेदारावर नोंद आहे. शहरी गरिबांच्या १३ हजार घरांची योजना नंतर ४,५०० घरावर आली. या विकासाभिमुख योजनांचे पालिकेने मातेरे केले.

अलीकडे तर चव्हाण हे ठाणे जिल्ह्याचे एकनाथ शिंदे म्हणून ओळखले जात होते. भाजपला सत्तास्थानी नेण्याच्या एका मोहिमेचा प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका बजावल्या. केंद्रीय भाजप नेत्यांच्या गळ्यातील ताईत बनले. आता ज्या पद्धतीने त्यांना मंत्रीपद नाहीच, प्रदेशाध्यक्षपदही नाही आणि ज्या कार्याध्यक्ष पदावर आता बसविले, त्यामुळे त्यांच्याविषयी भाजपमध्ये कोठेतरी बिनसले, असाचा कार्यकर्त्यांच सूर आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि चव्हाण यांच्यामधील धुसफूस डोंबिवली शहराच्या विकासाच्या मुळावर आली. भविष्यवेधी विचार नसलेला, पाचर मारणारा बाहेरचा माणूस जोडतोडीने मोठा होतो. त्याचे पालकत्व असलेले शहर मात्र आहे तसेच उकिरडा राहते. गलितगात्र डोंबिवली तेच अनुभवत आहे.

प्रतिमा संवर्धनासाठी प्रतिष्ठित मंडळींचा कंपू

प्रतिमा संवर्धनासाठी चव्हाण यांनी आपल्या मासिकाचाही आधार घेतला. उच्चशिक्षित डोंबिवलीकरांच्या सांस्कृतिक, साहित्यिक गरजा पूर्ण केल्या की ते समाधानी राहतात, हे हेरून या मासिकात अशा डोंबिवलीकरांच्या ‘प्रतिभे’ला वाव देण्यात आला. डॉक्टर, वकील, ज्येष्ठ पत्रकार, काही माजी संपादक, प्रकाशक, गायक, कलाकार, उद्याोजक अशा प्रतिष्ठित मंडळींचे एक वर्तुळ चव्हाण यांनी आपल्याभोवती उभे केले. या कंपूतून चव्हाण यांच्या कर्तृत्व आणि दातृत्वाच्या बातम्या व्यवस्थित पसरवण्यात आल्या.

डोंबिवलीच्या आखीव रेखीव विकासाकडे दुर्लक्ष

डोंबिवलीतील एक वर्ग बेकायदा बांधकामांची माळ रचत असताना त्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. मोजका परिसर सोडला तर १५ वर्षांच्या कारकीर्दीत चव्हाण कधीही डोंबिवलीचा आखीव रेखीव विकास करू शकले नाहीत.

Story img Loader