कल्याण : एकाच पक्षातील असूनही मागील दोन वर्षात एकमेकांचे तोंड न पाहणारे, एकमेकांच्या कार्यक्रमात न जाणारे भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाड मतदारसंघाचे भाजप आमदार किसन कथोरे यांचा समझोता झाला आहे. या समझोत्यानुसार आणि भाजपच्या वरिष्ठांनी आमदार कथोरे यांना जुने वैर सोडून कपील पाटील यांच्या समर्थनार्थ जोमाने काम करण्याच्या सूचना केल्याने आमदार कथोरे यांनी मुरबाड मतदारसंघात कपील पाटील यांचा गावागावात जाऊन प्रचार सुरू केला आहे.
या प्रचार मोहिमेमुळे खासदार पाटील समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दोन वर्षापासून कपील पाटील आणि आमदार कथोरे यांच्यात आगरी, कुणबी वाद, विकास कामे, भिवंडी लोकसभेतील उमेदवारी अशा अनेक विषयांवर कुरबुऱ्या सुरू होत्या. गेल्या वर्षभरात या कुरबुऱ्यांमुळे आमदार कथोरे भाजप सोडतात की अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे गट तयार झाले होते.
आमदार कथोरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात मिळणारा पाठिंबा विचारात घेऊन भाजपने आपणास भिवंडी लोकसभा निवडणूक लढविण्यास सांगितले तर तशी तयारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कथोरे यांच्या या मनोगतावरून पाटील समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे पाटील गट, कथोरे गट असे गट निर्माण झाले होते.
केंद्रीय भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याने कपील पाटील यांनी स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी अंतर ठेवल्याने त्याचा राग शहापूर, मुरबाड, भिवंडी, तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये होता. त्याचा लाभ आमदार कथोरे यांनी घेऊन या भागात स्वतःची एक तगडी फळी तयार केली होती. कथोरे यांच्या सारखा मुरब्बी नेता भिवंडी लोकसभा मतदारसंघात निर्माण झाला तर आपणास ते मोठे आव्हान असेल असा विचार करून पाटील यांनी दोन वर्ष कथोरे यांचे अनेक प्रकारे खच्चीकरण सुरू केले होते, असे कार्यकर्ते सांगतात.
हेही वाचा…माणकोली पुलावरील वाहन संख्या वाढल्याने डोंबिवलीतील रेतीबंदर रेल्वे फाटकात वाहनांच्या रांगा
हे वैर संपविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. लोकसभा निवडणुकीच्यावेळी हे वैर वाढून त्याचा पाटील यांना फटका बसण्याची चिन्हे होती. उमेदवारी जाहीर होताच, पाटील यांनी कथोरे यांच्या निवासस्थानी जाऊन दिलजमाईचा प्रयत्न केला. मुरबाडमध्ये आयोजित पाटील यांच्या कार्यकर्त्या मेळाव्यात कथोरे यांच्यासह समर्थकांनी अलीकडे दांडी मारली होती. पाटील, कथोरे यांच्यात धुसफूस सुरू असताना भाजपच्या वरिष्ठांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आमदार कथोरे यांनी पाटील यांच्या प्रचाराचे काम सुरू केले आहे. गावांमध्ये कथोरे यांना ‘आम्ही आमचे योग्य काम करू’, असे सूचित केले जात असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.
हेही वाचा…ठाणे – बेलापूर वाहतूक कोंडी, घणसोली स्टेशन समोर ट्रक पलटी
राष्ट्र प्रथम आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मुरबाड पट्ट्यात पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे. तरीही स्थानिक पातळीवर जे राजकीय वातावरण आहे. त्याची माहिती आपण भाजपच्या श्रेष्ठींना देणार आहोत. – किसन कथोरे, भाजप आमदार, मुरबाड