डोंबिवली – भारतीय जनता पक्षाच्या डोंबिवली पश्चिम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोपर भागात भिंती, सार्वजनिक ठिकाणी रंगविलेल्या कमळ चिन्हावर काळे फासणाऱ्या सम्राट मगरे, विशाल कोकाटे यांना विष्णुनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाचा आधार घेऊन अटक केली आहे. आपण हे कृत्य घाऱ्या नावाच्या इसमाच्या इशाऱ्यावरून केले असल्याची माहिती अटक आरोपींनी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलीस तो घाऱ्या इसम कोण याचा शोध घेत आहेत.
भाजपच्या केंद्रीय कार्यालयाने लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा क्षेत्रात भाजपची प्रचार मोहीम राबविण्याच्या सूचना भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्या आहेत. या आदेशाप्रमाणे भाजप डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष समीर चिटणीस, कोपर प्रभाग अध्यक्ष ऋषभ ठाकर आणि सहकाऱ्यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोपर भागातील सार्वजनिक भिंती, सोसायटीच्या भिंती, पालिका इमारतींच्या संरक्षित भिंतींवर पुन्हा एकदा मोदी सरकार हे घोषवाक्य आणि त्याच्या बाजूला भाजपचे चिन्ह कमळ रेखाटले होते. गेल्या आठवड्यापासून कोपर प्रभागात भाजप कार्यकर्त्यांनी ५० हून कमळाची चिन्हे रंगाने रेखाटली आहेत.
हेही वाचा – कळव्यात चोरट्यांचा सुळसुळाट! चक्क पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी चोरीला
शनिवारी सकाळी कोपर भाजप अध्यक्ष ठकार यांना कोपर भागातील भाजप कार्यकर्त्यांनी काढलेल्या कमळ चिन्हावर काळे फासले असल्याचे दिसले. ही माहिती त्यांनी मंडल अध्यक्ष चिटणीस यांना दिली. चिटणीस यांनी हा प्रकार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना सांगितला. अखेर चिटणीस यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून हे कृत्य करणाऱ्या इसमांंवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला.
मंडल अध्यक्ष समीर चिटणीस शनिवारी दुपारी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात दोन इसम चिन्हाला काळे फासत असल्याचे दिसून आले. ठकार यांनी केलेल्या चौकशीतून सम्राट मगरे, विशाल कोकाटे यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. मगरे, कोकाटे यांची छायाचित्रे शिवसेनेच्या फलकांवर नेहमीच असतात. त्यामुळे ते शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने कोकाटे, मगरे यांना अटक केली. आपणास घाऱ्या नावाच्या इसमाने कमळाला काळे फासण्याचे सूचित केले आहे, अशी माहिती आरोपींनी तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. आता पोलीस तो घाऱ्या इसम कोण याचा शोध घेत आहेत. उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने शिवसेना-भाजपमधील धुसफूस या प्रकाराने वाढण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा – कोलशेत भागात वीज पुरवठा खंडीत झाल्याने रहिवाशांचे हाल
मागील काही महिन्यांपासून विकास कामे, राजकीय चढाओढीतून शिवसेना-भाजपमध्येच कल्याण, डोंबिवलीत वाद रंगले आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे समर्थक शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेला गोळीबार, यापूर्वी विकास कामांच्या मुद्द्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी केलेले लक्ष्य. या धुसफुशीतून गेल्या वर्षी भाजपच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभेसाठी नवखा उमेदवार देण्याची मागणी करून शिवसेनेचे काम न करण्याचा ठराव केला होता. आता भाजपच्या कमळ चिन्हावर शिवसैनिकांनी काळे फासल्याने त्याचे पडसाद येत्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच उमटतील, असे स्थानिक भाजप पदाधिकारी सांगत आहेत.