ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात येत्या काळात त्यांना कशी वेसण घालता येईल याची चाचपणी भाजपच्या अंतर्गत गोटात सुरु झाल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील प्रभावी माजी नगरसेवकांना गळाला लावण्याची रणनिती शिंदे गोटाकडून सुरु आहे. असे असताना राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक असलेल्या कळव्यातील नगरसेवकांना पक्षात ओढण्याची रणनिती भाजपकडून आखली जात असून महापालिका निवडणुकीत युती झाली नाही तरी शिंदे यांना या माध्यमातून आव्हान उभे करता येईल का अशी आखणी केली जात आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कळवा, विटावा, मुंब्रा या भागात मोठी ताकद आहे. दिव्याला खेटून असलेल्या परिसरातही आव्हाड यांना मानणारा मोठा वर्ग असून महापालिका निवडणुकांमध्ये आव्हाडांची ही ताकद नेहमीच दिसून येते. ठाणे महापालिका हद्दीतील जवळपास ३९ नगरसेवक हे कळवा-मुंब्रा परिसरातून निवडून येतात.

ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्रात एकनाथ शिंदे यांची मोठी ताकद असून जुन्या ठाण्यात भाजपचा प्रभाव दिसतो. या तुलनेत या तीन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅग्रेसची अवस्था फारच बिकट आहे. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या पक्षाला आव्हान उभे करायचे असले अथवा युतीच्या राजकारणात अधिकच्या जागांवर दावा करायचा असेल तर वेगवेगळ्या प्रभागांमध्ये वर्चस्व राखणाऱ्या स्थानिक नेत्यांची फौज आपल्याकडे असायला हवी याची जाणीव आता भाजप नेत्यांना होऊ लागली आहे.

वागळे इस्टेट तसेच आसपासच्या परिसरात शिंदे यांचा मोठा दबदबा आहे. या भागातील विरोधकांनीही त्यांच्यापुढे तलवार म्यान केल्याचे चित्र आहे. याशिवाय क्लस्टरच्या माध्यमातून वागळे परिसरात शिंदे यांनी आपला प्रभाव आणखी वाढविला आहे. त्यामुळे वागळेला आव्हान उभे राहील अशा पर्यायाच्या शोधात सध्या भाजप नेते असून आव्हाडांच्या कळवा परिसरावर या पक्षाने लक्ष केंद्रीत केल्याचे चित्र आहे.

आव्हाडांचे नगरसेवक कोण फोडणार ?

जितेंद्र आव्हाड आमदार असलेल्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात भाजपची अवस्था अगदीच तोळामासा आहे. हा मतदारसंघ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांच्या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणचे बहुसंख्य नगरसेवक आपल्या पक्षात कसे येतील यासाठी पद्धतशीर व्युहरचना डाॅ.श्रीकांत आखत आहेत. ही घडामोड सुरु असताना भाजपनेही या मतदारसंघातील आव्हाड समर्थक नगरसेवकांवर लक्ष केंद्रीत केले असून कळव्यातही आव्हाड आणि शिंदे अशा दोघांनाही आव्हान उभे करायचे अशी आखणी केली जात आहे.

कळव्यातील राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे १८ आजी-माजी नगरसेवकांना गळ घालण्यास सुरूवात झाली असून यापैकी काहीजणांसोबत भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याचे सुत्रांकडून समजते. सध्या सत्ता नसल्यामुळे आव्हाड यांच्यासोबत असलेले बहुसंख्य नगरसेवकही अस्वस्थ आहेत. प्रभागातील कामांसाठी निधी मिळत नाही, याशिवाय स्थानिक कामांमध्ये फारसे कुणी ऐकत नाही अशी अनेकांची अवस्था आहे.

त्यामुळे सत्ता असलेल्यांच्या वळचणीला जाऊन बसावा असा विचार यापैकी काही जण करत असून नेमके याच मंडळींना टिपण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे. कळव्यात आव्हाडांना लक्ष्य केले जात असल्याचे चित्र या माध्यमातून रंगविले जात असले तरी शिंदे यांनाही ठाण्याचा पेपर सोपा जाऊ नये अशी रणनिती भाजपच्या गोटातून खेळली जात असल्याची आता चर्चा आहे.

नगरसेवक संख्याबळ

ठाणे महापालिकेची २०१७ मध्ये नगरसेवक पदाच्या १३१ जागांसाठी निवडणुक झाली होती. त्यावेळी शिवसेनेचे ६७, भाजपचे २३, राष्ट्रवादीचे ३४, काँग्रेसचे ३, एमआयएमचे २ आणि अपक्ष दोन असे १३१ नगरसेवक निवडूण आले होते. यातील कळवा-मुंब्रा भागातील एकूण ३९ जागांमधून २८ नगरसेवक निवडुण आले होते. त्यात कळव्यातील १६ जागांचा समावेश होता. त्यामध्ये राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडूण आले होते. त्यामुळे हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर हा परिसर कुणाचा बालेकिल्ला राहील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हा परिसर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दाखवून दिले होते.