नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून याच मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या भाजपाने सोमवारी दुपारी ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घोडबंदर भागाला पुरेसे पाणी देण्याची मागणी मोर्चेकरांनी केली.

घोडबंदर परिसरात मोठी गृहसंकुले उभी रहीली असून आजही गृहसंकुले उभारणीची कामे सुरू आहेत. यामुळे या भागाचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून त्या तुलनेत येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असून यामुळे नागरिकांना देखभाल व दुरुस्ती व्यतिरिक्त पैसे काढावे लागत आहेत. पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत असतानाच भाजपने पालिका मुख्यल्यावर मोर्चा काढला होता.भाजपकडून नितीन कंपनी जंक्शन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. पाण्याविना विकास, घोडबंदर भकास आणि स्वतंत्र धरणाचे काय झाले, अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी झळकविले होते. तसेच घोडबंदर भागाला पुरेसे पाणी देण्याची मागणी केली.

भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे काढण्यात आला होता. या सर्वांनी महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची भेट घेतली. शहरातील बंद असलेल्या कूपनलिका सुरू करणे, विहिरी साफ करणे, विकासकांनी घेतलेली बेकायदा नळ जोडणी शोधून ती तोडणे,असे आश्वासन आयुक्त शर्मा यांनी दिल्याची माहिती आमदार डावखरे यांनी दिली. तसेच स्टेमकडून दुरुस्तीसाठी सातत्याने बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो, त्याचे योग्य नियोजन करून पाणी टंचाई समस्या सोडविण्याची मागणीही केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे शहरातील सर्वच भागात पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये आक्रोश आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ वागळे इस्टेट भागाला १० दशलक्ष लिटर इतके पाणी वाढवून घेतले आहे. या भागाला पाणी मिळायलाच हवे पण, त्याचबरोबर इतर भागातही वाढीव पाणी मिळायला हवे. पालकमंत्री हे संपूर्ण जिल्ह्याचे आहेत. केवळ वागळे इस्टेटचे नाहीत.-संजय केळकर,आमदार, भाजपा</p>