कल्याण- आगामी पालिका निवडणुकीनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेत भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी येथे व्यक्त केला. युतीच्या माध्यमातून ही निवडीची प्रक्रिया होईल. या सर्व प्रक्रियेत शिवसेनेला विश्वासात घेतले जाईल, असे ते म्हणाले. कल्याण जिल्हा भाजपतर्फे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची पत्रे वाटप आणि कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम रविवारी कल्याणमध्ये आयोजित केला होता. यावेळी मंत्री चव्हाण माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली, कल्याणमधील बाजार गजबजले, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने खरेदीसाठी गर्दी

आगामी पालिका आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कार्यकारिणीत नव्याने तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. येणाऱ्या सर्वच निवडणुका शिवसेना- भाजप युतीच्या माध्यमातून लढविल्या जातील. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत हेच सूत्र वापरले जाईल. या निवडणुकीनंतर पालिकेत भाजपचा महापौर असेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दिलेल्या शब्दाला जागतील, असेही ते म्हणाले.

माकडे ज्या झाडावर असतात. ज्या झाडाला गोड फळे येतात. त्याच झाडावर दगड मारल्या जातात. अशाच पध्दतीने आमदार गायकवाड यांनी भरपूर विकास कामे केली आहेत. ती काही जणांना सहन होत नाहीत. म्हणून ते गायकवाड यांना लक्ष्य करत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करायचे असते, असा सल्ला मंत्री चव्हाण यांनी आ. गायकवाड यांना दिला.

शिवसेना लक्ष्य

आ. गणपत गायकवाड यांनी या कार्यक्रमात शिवसेनेला लक्ष्य केले. त्यांच्याकडे धनुष्यबाण असले तरी माझ्याकडेही आता रॉकेट आहेत. तेही आता चांगले काम करुन बाणाला उत्तर देऊ शकतात. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी जशास तसे उत्तर देईन. कल्याण पूर्व भागात आतापर्यंत १२९ कोटीचा निधी मी आणला. त्या निधीतून इतर पक्षाची लोक स्वताची नाममुद्रा लावून आपण निधी आणल्याची टिमकी वाजवित आहेत. आपण हा निधी शासनस्तरावरुन मंजूर करुन घेतला. परंतु, तो काही मंडळींनी या निधी आणि कामाचे श्रेय मला मिळू नये म्हणून प्रत्येक टेबलला अडवून ठेवला. हाच निधी वेगळ्या माध्यमातून मुक्त करुन त्यांनी आणला आहे. तो सगळा हिशेब आपल्याकडे आहे. तो योग्यवेळी आपण बाहेर काढू, असा इशारा आ. गायकवाड यांनी शिवसेना नेत्यांना दिला.

हेही वाचा >>> कल्याण जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनंत कुलकर्णी

कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आपण निधी मंजूर करुन आणला. आणि आता त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी नंतर वेगळेच लोक पुढे आले. एकदा का लोकसभेच्या निवडणुका झाल्या की मग मात्र मी यांच्या प्रत्येक आरोपाला मी सविस्तर उत्तर देईन, असा इशारा गायकवाड यांनी दिला. लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस असतात. पण कल्याणमध्ये शिवसेनेतील पदाधिकारी असलेल्या गुंडांना खासगी सुरक्षा, चार पोलिसांचा बंदोबस्त दिला जातो. तो बंदोबस्त काढून घ्यावा म्हणून यासाठी आपण शासनाला पत्र दिली आहेत, असे गायकवाड म्हणाले. गायकवाड यांच्या प्रत्येक बोलण्याचा रोख शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांचे खंदे समर्थक कल्याण पूर्वेचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या दिशेने होता. मागील काही महिन्यांपासून महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे.