लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: नाले, गटार सफाईची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण होणे आवश्यक होते. आता अर्धा जून गेला तरी कल्याण डोंबिवली पालिकेची नाले, गटार सफाईची कामे पूर्ण होत नसल्याने संतप्त झालेल्या कल्याण पूर्वचे आ. गणपत गायकवाड यांनी पालिका अधिकाऱ्यांना शुक्रवारी खडेबोल सुनावले.
तुम्ही नालेसफाई नाही तर, नालेसफाईसाठी प्रस्तावित असलेल्या आठ कोटी निधीची, पालिका तिजोरीची सफाई करत आहात, अशी टीका आ. गायकवाड यांनी केली. गटार सफाईची कामे पूर्ण झाली नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. या सांडपाणी, चिखलाच्या पाण्यातून विद्यार्थी, पालक, पादचाऱ्यांना येजा करावी लागते. अनेक ठिकाणी गटारांचा गाळ ठेकेदारांनी गटाराच्या काठावर ठेवला आहे. हा गाळ पावसाच्या पाण्याने पुन्हा गटारात वाहून जाणार आहे. गटार सफाईचा उपयोग काय, असा प्रश्न आ. गायकवाड यांनी केला.
आणखी वाचा-ठाकुर्ली रेल्वे स्थानकात चोरी करणारी महिला टिटवाळ्यातून अटक
कल्याण पूर्व भाग उंच, सखल असल्याने या भागाची नाले, गटार सफाई झाली आहे की नाही याची पाहणी आ. गायकवाड यांनी घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, साहाय्यक आयुक्त भरत पाटील, सविता हिले यांच्या उपस्थितीत केली. यावेळी विठ्ठलवाडी नाल्यातून कचरा, गाळ असल्याचे आमदारांना दिसले. अनेक ठिकाणी गटारातील गाळ काठावर ठेवल्याचे दिसले. हा प्रकार पाहून संतप्त आमदारांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
अधिकाऱ्यांवर कोणाचा अंकुश राहिला नसल्याने अधिकारी मनमानीने काम करत आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. पाऊस सुरू झाला आहे. आता नाले, गटार सफाईची कामे वेळेत पूर्ण झाली नाही. सांडपाणी रस्त्यावर येऊ लागले तर त्याची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न आमदारांनी उपस्थित केले. नाले सफाईची बहुतांश कामे पूर्ण होत आली आहेत. नाल्यांमध्ये कचरा दिसतोय तो पुन्हा काढून टाकला जाईल. गटाराच्या बाजुचा गाळ तातडीने उचलण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात येतील, असे उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितले.
आणखी वाचा-ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील म्हसोबा चौकाला टपऱ्यांचा विळखा, टपऱ्यांना राजकीय पक्षांचे फलक
दरम्यान, गटार सफाईच्या कामाचे अद्याप आम्हाला आदेश प्राप्त नाहीत. ठेकेदारांनी गट तयार करुन अधिकाऱ्यांच्या शब्दामुळे गटार सफाईची कामे सुरू केली आहेत. गटार सफाईची ६० टक्के कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती काही ठेकेदारांनी दिली. ठेकेदारांवर ओरडून काम करुन घेतले तर ते काम सोडून देतील या भीतीने ठेकेदारांना बोलण्याचे धाडस अधिकारी करत नाहीत, असे कळते. गेल्या आठवड्यात पाऊस सुरू होताच डोंबिवली, कल्याण मधील विविध भागातील रस्ते जलमय झाले होते. पावसाळ्यापूर्वीच खड्डे, चऱ्या भरण्याची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांमधील रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिक, वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.