ठाणेः गेल्या काही वर्षात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील सोमवारी मराडेपाडा येथील कार्यक्रमात एकाच मंचावर सोबत दिसले. भिवंडीतील शिवक्षेत्र मराडे पाडा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.फडणवीस यांच्यासमोर दोघांनी एकमेकांचा नामोल्लेख केला. यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रेही मंचावर उपस्थित होते.

गेल्या काही वर्षात ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये उघड वाद असल्याचे जगजाहीर आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यात आणि त्यांच्या समर्थकांमधला वाद गेल्या काही वर्षात वाढल्याचे चित्र होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कपिल पाटील यांनी थेट आमदार किसन कथोरे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली होती.

आपल्या पराभवाला कथोरेच जबाबदार असल्याचे पाटील यांनी अनेकदा बोलताना उघडपणे सांगितले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही हा संघर्ष सुरूच राहिला. कथोरे यांनी आपल्या विजयानंतर माजी लोकांना परत आजी होऊ देणार नाही, असा इशाराही दिला होता. त्यानंतर सातत्याने दोन्ही भाजप नेते एकमेकांवर उघड टीका करताना दिसले.

भिवंडी तालुक्यात दिलेल्या निधीवरून आमदार किसन कथोरे यांच्यावर आक्षेप घेण्याचे काम कपिल पाटील यांनी केंद्रीय मंत्री असतानाच केले होते. भिवंडी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कथोरे यांचे मोठे समर्थक आहेत. सध्या भिवंडी तालुक्यातील ज्या मराडे पाडा गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. येथेही कथोरे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे कथोरे गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमात पुढाकार घेताना दिसले.

सोमवारी शिवजयंतीच्या निमित्ताने या मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमानिमित्त भाजपचे हे दोन्ही नेते फडणवीसांच्या समोर सारे काही आलबेल असल्यासारखे वावरताना दिसले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करण्यापासून सर्वच ठिकाणी दोन्ही नेते एकत्र होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या मंचावर माजी मंत्री कपिल पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांचा तर कथोरे यांनी पाटील यांचा आवर्जून नामोल्लेख केला. विशेष म्हणजे दोघांची आसन व्यवस्थाही शेजारी शेजारीच होती. हे चित्र पाहून कोंडीत सापडलेल्या संयुक्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा मात्र जीव भांड्यात पडला आहे.

विकासपुरूष आमदार किसन कथोरे

या कार्यक्रमात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी आपल्या भाषणात मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांचा विकासपुरूष आमदार असा उल्लेख केला. म्हात्रे यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. म्हात्रे यांच्या विजयात कथोरे यांचा अप्रत्यक्ष वाटा असल्याच्या चर्चा लोकसभा निवडणुकांत रंगल्या होत्या.