ठाणे : शासनाच्या धोरणाकडे दुर्लक्ष शासनाचा महसुल बुडवून ठाणे जिल्ह्यातील कशेळी ते दिवा खाडी पट्ट्यात अवैध वाळू उपसा सुरू असून अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासनाच्या महसुलाची लुट सुरू असल्याचा गंभीर आरोप करत या मोकाट वाळू माफियांना चाप बसविण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे जिल्ह्यातील खाडी किनारी भागात गेल्या काही वर्षांपासून अवैध वाळू उपसा करण्याचे प्रकार वाढले असून याविरोधात जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असली तरी या कारवाईनंतर अधिकारी माघारी फिरताच पुन्हा वाळू उपशाला सुरुवात होत असल्याचे चित्र आहे.

या मुद्द्यावरून जिल्हा प्रशासनावर टिका होताना दिसून येते. असे असतानाच, भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही वाळू माफियांविरोधात आक्रमक भुमिका घेत त्यांना चाप बसविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. ठाणे जिल्ह्यातील दिवा, कळवा, मुंब्रा हा परिसर मोठ्या प्रमाणात खाडी किनाऱ्यालगत आहे. येथील नागरिक लहान-मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. पूर्वी रेती उपसा करण्यास शासनाची परवानगी होती. मध्यंतरी शासनाने आपले धोरण बदलून ऑनलाइन पद्धत राबविण्यास सुरूवात केली.

परंतु शासनाच्या या धोरणांकडे दुर्लक्ष करून आणि शासनाचा कोणताही महसूल न भरता अवैध वाळू उपसा कशेळी ते दिवा खाडी पट्ट्यात सर्रास सुरू आहे, असा आरोप संजय केळकर यांनी केला आहे. कशेळी ते दिवा खाडी पट्ट्यात मोठमोठे बाज यांत्रिक पद्धतीने काही परिसरात उभे करून दिवसरात्र अवैध वाळू उपसा सुरू आहे. या प्रकारामुळे अनेक धोके निर्माण झाले असून या अवैध वाळू उपश्यास स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. यामुळे वाळू माफियांकडून धमकावले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

अवैध वाळू उपश्याबाबत संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. तसेच या ठिकाणी अवैध वाळू उपसा अधिकाऱ्यांच्या संगनमताने, आशीर्वादाने सुरू असून शासनाचा महसूल बुडत असल्याने मोठ्या प्रमाणात शासनाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केळकर यांनी निवेदनातून केला आहे. याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून तेथील अवैध रेती उपशाला प्रतिबंध घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यावर आता जिल्हाधिकारी काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader