ठाणे : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपाची घोषणा करत जनता दरबार आयोजित केल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध रंगले असतानाच, ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनीही आमदार आपल्या भेटीला उपक्रमांतून एकप्रकारे जनता दरबार भरविण्याचे ठरविले आहे. यामुळे मंत्री नाईक यांच्यापाठोपाठ आता ठाण्यातील आमदारांचाही जनता दरबार भरणार असल्याचे चित्र आहे.

राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांचे सरकार असले तरी ठाण्यात मात्र शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. ठाणे येथील कोपरी भागातील कार्यक्रमात बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपाची घोषणा केली. या घोषणेनुसार त्यांनी येत्या सोमवारी ठाण्यात जनता दरबार आयोजित केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर ओळखले जाते. याठिकाणी नाईक हे जनता दरबार घेणार आहेत. यामुळे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकताच नवी मुंबईत पक्षाचा मेळावा घेतला होता. त्यात ‘मी जिथे उभा राहतो, तिथून जनसेवा सुरू होते, मी कधीही दरबारी राजकारण केले नाही’, असे विधान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले होते. या विधानाच्या माध्यमातून त्यांनी नाईक यांना टोला लगावल्याची चर्चा होती.

ठाण्यात भाजपक़डून सदस्य नोंदणी तसेच जनता दरबारच्या माध्यमातून पक्ष ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नेत्यांनी शहरात पक्षाचे मेळावे घेऊन आपली ताकद दाखविण्यास सुरूवात केली आहे. अशाचप्रकारे बुधवारी शिवसेनेच्या नेत्यांनी ठाण्यात एक बैठक घेऊन त्यात ठाणे महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतानाच, ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनीही आमदार आपल्या भेटीला उपक्रमांतून एकप्रकारे जनता दरबार भरविण्याचे ठरविले आहे. खोपट येथील भाजप कार्यालयामध्ये दर सोमवार ते शुक्रवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० यावेळेत आमदार आपल्या भेटीला या उपक्रमाद्वारे आमदार केळकर आणि डावखरे हे नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या सोडविणार आहेत.

सर्वच मंत्र्यांनी जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडविले पाहिजेत. आम्ही सुद्धा आमदार आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचे प्रश्न सोडवित असून हाच उपक्रम आता पक्ष कार्यालयात दर सोमवार ते शुक्रवारी राबविला जाणार आहे. संजय केळकर आमदार, भाजप

Story img Loader