नालासोपारा येथील भाजपाच्या पदाधिकारी रुपाली चव्हाण (वय ३२) यांची हत्या केल्याचे समोर आले असून चव्हाण यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरीच आढळला. दोन दिवसांपूर्वीच त्यांची हत्या करण्यात आली असून त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. त्यांना इस्त्रीचे चटके देखील दिले होते, अशी माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील तपस्या अपार्टमेंटमध्ये बी विंगमध्ये रुपाली चव्हाण राहत होत्या. रुपाली चव्हाण या घटस्फोटित होत्या. चव्हाण यांचे वडील जवळच राहत होते. त्या मूळच्या पुण्याच्या असून दोन वर्षांपूर्वीच त्या नालासोपारा येथे राहायला आल्या होत्या. त्यांना १० वर्षांचा मुलगा असून तो वडिलांकडे रहातो.

चव्हाण यांनी एक दुकान घेतले होते आणि त्यात पादत्राणे विक्रीचा व्यवसाय सुरू करणार होत्या. मंगळवारी चव्हाण यांच्या दुकानाचे उद्घाटन होणार होते. मात्र त्या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे रुपाली यांच्या वडिलांनी परिचयातील एका व्यक्तीला रुपाली यांच्या घरी जाण्यास सांगितले. मंगळवारी सकाळी संबंधित व्यक्ती रुपाली यांच्या घरी गेल्या असता त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता आणि अंगावर धारदार शस्त्राच्या खुणा होत्या. दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांना इस्त्रीचे चटके आणि विजेचा शॉक दिल्याचा अंदाज आहे. त्या भाजपाच्या वसई विरारच्या युवती सहप्रमुख होत्या.

मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.