शिवसेनेच्या स्वबळावर आठ जागा, भाजप सहा, राष्ट्रवादीला तीन जागा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर : शिवसेनेविरोधात सर्वपक्षीयांनी दंड थोपटल्याने चुरशीच्या ठरलेल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसेच्या आघाडीने १८ पैकी दहा जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेने आठ जागा पटकावत सभापती पदाच्या निवडणुकीतील चुरस कायम ठेवली आहे. आघाडीतील दहापैकी सहा जागांवर भाजपने तर तीन जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. बाजार समितीत शिवसेनेचा पराभव व्हावा यासाठी भाजपचे जिल्ह्य़ातील बडे नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. सर्वपक्षीय आघाडीनंतरही सर्वाधिक सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी १७ मार्च रोजी मतदान पार पडले.

शिवसेनाप्रणीत पॅनलला पराभूत करण्यासाठी भाजपने राज्य आणि केंद्रातील कट्टर विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांशी आघाडी केली होती.

राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भाजपचे आमदार किसन कथोरेही बाजार समितीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले होते. या निवडणुकीतील बाराव्या गणातील मतपेटीतील मतपत्रिका जळाल्याने निकाल रखडला होता. अखेर सोमवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. यात १८ जागांपैकी दहा जागांवर भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि मनसेप्रणीत आघाडीला दहा जागा मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची

कल्याण पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी आघाडी केली होती. मात्र पंचायत समिती सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी भाजपच्या उमेदवाराला साथ दिल्याने सेनेचा पराभव झाला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालानंतर राष्ट्रवादी भाजपसोबतच राहील का, असा सवाल उपस्थित होत आहे. तर पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याचे पालन केले जाईल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगितले जाते आहे.