ठाणे : ठाण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या माराहणीनंतर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या मित्र पक्षांचे स्थानिक पातळीवर संबंध ताणले गेले असतानाच, भाजपने ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सोमवारी भाजपच्या शिष्टमंडळाने ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेऊन वागळे इस्टेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मारहाण प्रकरणाची वागळे इस्टेट पोलिसांकडून गंभीर दखल घेण्याची आवश्यकता होती. मात्र, हल्ला झाल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात दिरंगाई झाली. संबंधित पोलीस अधिकारी दबावाखाली आहेत, असा आरोप भाजपच्या शिष्टमंडळाने यावेळी केला. दरम्यान, सोमवारी दुपारी वागळे इस्टेट पोलिसांनी मारहाण प्रकरणात एका आरोपीला अटक केली.
हेही वाचा >>> ठाण्याचे शरद कुलकर्णी यांचा ‘माउंट विन्सन’ सर करून नवा विक्रम; वयाच्या साठाव्या वर्षी अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखर केले सर
ठाणे येथील कशीश पार्क भागात शुक्रवारी भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील काही जणांचा फलक लावण्यावरून वाद झाला होता. या प्रकारानंतर प्रशांत जाधव यांच्यावर अचानक १५ ते २० जणांच्या जमावाने हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी शनिवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर रेपाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्रशांत जाधव यांच्यावरही विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचे स्थानिक पातळीवरील वाद चव्हाट्यावर आले होते.
हेही वाचा >>> ठाणे : अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचे निषेध आंदोलन
दरम्यान, याप्रकरणात कारवाई होत नसल्याचा आरोप करत भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. या दरम्यान शिष्टमंडळाने आयुक्त सिंग यांना एक निवेदन दिले. याप्रकरणाची वागळे इस्टेट पोलिसांकडून गंभीर दखल घेण्याची आवश्यकता होती. मात्र, हल्ला घडल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात दिरंगाई झाली. त्यामुळे आरोपी मोकाट फिरत होते. वागळे इस्टेट पोलिसांनी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत. पोलिसांकडून पक्षपाती भूमिका घेतली गेली, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून हेतुपुरस्सर व जाणूनबूजून कारवाईला दिरंगाई होत आहे. तसेच संबंधित पोलिस अधिकारी दबावाखाली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली. या घटनेच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर भाजपचे आणि शिंदे गटाचे संघर्ष वाढल्याचे दिसून येत आहे.
हल्ल्याप्रकरणी रेपाळे यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा
प्रशांत जाधव यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी रेपाळे यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल होता. त्यापैकी एकाला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.