बदलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी बदलापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बदलापूर महापालिकेची मागणी केली आहे. बदलापूर शहर वाढते शहर आहे. त्यामुळे आम्हाला अंबरनाथसोबत एकत्रित महापालिकेत समाविष्ट न करता स्वतंत्र महापालिका द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीमुळे अंबरनाथ आणि बदलापूर संयुक्त महापालिकेच्या एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेला तडा जाणार असल्याचे बोलले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही शहरे गेल्या काही वर्षांपासून चौथी मुंबई म्हणून ओळखली जात आहेत. अ वर्ग नगर पालिका असलेल्या या शहरांना महापालिकांसारखाच निधी दिली जातो. मुंबई महानगर प्रदेशात असलेल्या या शहरांमध्ये महापालिकांच्या धर्तीवर प्रकल्पांची उभारणी केली जाते. परवडणारे घरे, निसर्गसंपन्नता यामुळे इथे स्थलांतरीत होणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली. गेल्या पाच वर्षांपासून येथे प्रशासकीय राजवट आहे. मात्र जेव्हाही पालिका निवडणुकांची चर्चा होती. त्यावेळी एकत्रित महापालिकेचीही चर्चा होते. शिवसेनेची सत्ता असलेल्या या दोन्ही नगरपालिकांमध्ये भाजप सहकारी पक्ष आहे. आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या दोन्ही शहरांची एकत्रित महापालिका करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली जाते. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीही यासाठी हिरवां कंदील दिला होता. तर काही दिवसांपूर्वी बदलापुरात आलेल्या वन मंत्री गणेश नाईक यांनी तर चक्का एकत्रित महापालिकेचे शिवसेनेचे वामन म्हात्रे हे महापौर होतील, असा दावाही केला होता. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती.

भाजपच्या वतीने आणि विशेषतः आमदार किसन कथोरे यांच्या वतीने बदलापूर शहराची क्षमता पाहता स्वतंत्र महापालिका करावी अशी मागणी केली जाते आहे. आसपासचा परिसर, शहराचे वेगळेपण आणि इथल्या संस्कृतीला अबाधित ठेवण्यासाठी बदलापूर स्वतंत्र महापालिकाच करावी असा आग्रह भाजपचा आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापुरात आले होते. त्यावेळी भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी प्रास्ताविक करताना बदलापूर शहराची स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी केली. आमची आणि कथोरे साहेबांचीही हीच मागणी आहे. बदलापूर वाढते शहर आहे. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र महापालिका पाहिजे. येणाऱ्या जनगणनेत लोकसंख्या वाढलेली असेल. त्यामुळे आम्हाला अंबरनाथसोबत महापालिका नकोच, असेही घोरपडे मंचावर म्हणाले. तसेच आमची ताकद मोठी आहे. भाजपची एकहाती सत्ताही येऊ शकते. येणाऱ्या पालिकेत युती किंवा एकहातीही भाजप सत्ता आणू शकतो, असेही घोरपडे यावेळी म्हणाले. घोरपडेंच्या या मागणीला कथोरे यांचे पाठबळ आहे असे समजले जाते. मात्र एकत्रित महापालिका कि स्वतंत्र महापालिका यावर फडणवीस यांनी बोलणे टाळले. त्यामुळे निवडणुकांची घोषणा होईपर्यंत एकत्रित की स्वतंत्र महापालिका हा प्रश्न अनुत्तरीतच राहणार हे मात्र नक्की आहे.