नागरिकांच्या सुविधेसाठी आरक्षित असलेले उद्यान (नाना नानी पार्क) पालिका अधिकारी, काही हितसंबंधी मंडळींनी अन्य भागात नियमबाह्य स्थलांतरित केले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांवर अन्याय झाला आहे. नागरिकांच्या हक्काचे आरक्षित असलेले उद्यान (नाना नानी पार्क) आहे त्या ठिकाणीच उभारले गेले पाहिजे, या मागणीसाठी डोंबिवली पूर्व राजाजी रस्त्यावरील म्हात्रेनगर प्रभागाचे भाजपचे माजी नगरसेवक मुकुंद पेडणकेर यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी शनिवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा >>>कल्याण: कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू; पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे कुटुंबियांचे आरोप

उपोषणामुळे काही हितसंबंधी, नगररचना विभागातील अधिकारी अडचणीत येणार असल्याने भाजपच्या वरिष्ठांनी बेमुदत साखळी उपोषणाचे संयोजक माजी नगरसेवक पेडणेकर यांना आपण उपोषण करू नये सूचित केले होते. त्या मागणीकडे लक्ष न घेता लोकांच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असे वरिष्ठांना सांगून भाजप पदाधिकारी शनिवारी सकाळपासून न्यू आयरे रस्त्यावरील संकेत इमारती जवळ बेमुदत साखळी उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा >>>“सर्वोच्च शक्तीमान माणूस कोण?”, जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपामुळे नव्या चर्चेला सुरुवात

माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी सांगितले, प्रभाग क्रमांक ६७ मधील म्हात्रेनगर येथील न्यू आयरे रस्ता भागातील विठाई कृपा सोसायटी जवळ कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे लाखो रुपये खर्च करुन नाना नानी पार्क विकसित करण्यात आले होते. परिसरातील नागरिक या सुविधेचा लाभ २०१७ पर्यंत घेत होते. हे नाना नानी पार्क पालिकेतील मालमत्ता, नगररचना, काही हितसंबंधी मंडळींनी कट रचून अस्तित्वात असलेल्या जागेवरुन हटवून अन्य भागात नियमबाह्य स्थलांतरित केले. या उद्यानाची जागा पालिकेने मूळ मालकास योग्य मोबदला देऊन ताब्यात घेतली होती. आता उद्यानाच्या मोकळ्या झालेल्या जागेचा मोबदला पालिकेने नियमबाह्यपणे हितसंबंधी विकासकाला दिला आहे. या नियमबाह्य प्रकरणाची माहिती आपण दोन वर्षापासून पालिकेतून मागतो पण आयुक्त, मालमत्ता विभाग, नगररचना विभाग, संबंधित अधिकारी ही माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत, असे पेडणेकर यांनी सांगितले.

नागरिकांची हक्काची सुविधा असलेले उद्यान दुसऱ्या भागात नियमबाह्यपणे मालमत्ता, नगररचना विभागातील मातब्बर अधिकाऱ्यांनी परस्पर स्थलांतरित केले. या उद्यानाच्या जागेचा दोनदा मोबदला देण्याचा नियमबाह्य प्रकार अधिकाऱ्यांनी केला आहे. उद्यानासाठी जमीन देणाऱ्या मूळ मालकाला योग्यवेळी मोबदला देण्यात आला असताना, पुन्हा उद्यान स्थलांतरित केल्यावर त्या जागेचा मोबदला देण्याचा पालिकेला कोणता अधिकार आहे, याविषयी पालिकेला एकही अधिकारी बोलण्यास, लेखी उत्तर देण्यास तयार नाही, असे पेडणेकर यांनी सांगितले.

नाना नानी पार्कसाठी जनतेचा पैसा खर्च केला. ते नंतर मोडीत काढले. या बेकायदा हालचाली रोखण्यासाठी प्रयत्न करुनही अधिकारी दाद देत नसल्याने या प्रकरणातील दोषी मालमत्ता, नगररचना अधिकारी, विकासक यांची सखोल चौकशी व्हावी. त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण उपोषण करत आहोत, असे मुकुंद पेडणेकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>उल्हासनगरात ठाकरे गटाला गळती सुरूच, विद्यमान शहरप्रमुखाचा माजी नगरसेवकासह शिवसेनेत प्रवेश

पोलिसांत तक्रार

न्यू आयरे रस्त्यावरील विठाई कृपा सोसायटी जवळील हटविलेले नाना नानी पार्क चोरीला गेल्याने माजी नगरसेवक पेडणेकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पालिकेच्या मालमत्ता विभाग, नगररचना विभागाने या उद्यानाला कोठे लपून ठेवले आहे. याची माहिती देणाऱ्याचा योग्य सन्मान केला जाईल, असे आवाहन साखळी उपोषणाचे संयोजक पेडणेकर यांनी केले आहे.

“नाना नानी पार्क ही स्थानिक लोकांसाठीची सुविधा होती. ती नियमबाह्यपणे या भागातून स्थलांतरित केली आहे. या जागेचा नियमबाह्य मोबदला संबंधित हितसंबधीताला देण्यात आला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या या बेकायदा कृतीबद्दल हे उपोषण आहे. या प्रकरणातील सर्वांची चौकशी झाली पाहिजे.”-मुकुंद पेडणेकर,माजी नगरसेवकभाजप, म्हात्रेनगर.