जयेश सामंत
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी ठाणे लोकसभेची जागा शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याची तयारी भाजपने आता दाखवली आहे. मात्र येथून कुणाला उमेदवारी द्यायची, यावरून या दोन पक्षांत एकवाक्यता होत नसल्याचे वृत्त आहे. शिंदे गोटातून माजी महापौर मीनाक्षी शिंदे शेट्टी किंवा नरेश म्हस्के ही दोन नावे पुढे करण्यात आली असली, तरी सर्वेक्षण अहवालाचे दाखले देत या नावांना भाजपकडून संमती मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी शक्तिप्रदर्शन करत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र महायुतीच्या गोटात रात्री उशिरापर्यंत उमेदवारीचा घोळ कायम होता. गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळ्या नावांचे प्रस्ताव भाजपकडे पाठविले जात असून माध्यमातून काही नावांची चर्चा पद्धतशीरपणे घडवून आणली जात आहे. या नावांवर महायुतीत कशी प्रतिक्रिया उमटते याचा अंदाज दोन्ही पक्ष घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत ठाण्याची जागा आपल्या गटाला सुटावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. भाजपकडून या जागेसाठी नवी मुंबईतील नेते गणेश नाईक किंवा त्यांचे पुत्र, माजी खासदार संजीव यांच्या नावाचा आग्रह धरला गेला होता. मात्र या नावांना शिंदेसेनेत तीव्र विरोध असल्याचे सांगितले जाते. ठाणे आणि पालघरपैकी ठाणे शिंदे गटाकडे, तर पालघर भाजपकडे देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच पक्का झाल्याची माहिती आहे. मात्र ठाण्याच्या जागेसाठी शिंदेसेनेकडून पुढे आणण्यात आलेल्या पर्यायांवर भाजपच्या ‘चाणाक्यां’नी सर्वेक्षण अहवालाचे दाखले देत हरकत घेतल्याने हा तिढा सोमवारी रात्रीपर्यंत कायम होता. यासंबंधी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोटातून प्रतिक्रिया देण्यास कुणीही तयारी दर्शवली नाही.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील घरडा सर्कलकडे जाणारे रस्ते ६ मेपर्यंत दिवसभर बंद

पुन्हा तोच निकष?

●मुख्यमंत्र्यांनी आपल्याबरोबर आलेल्या १३ खासदारांच्या जागांसाठी सुरुवातीपासून आग्रह धरला आहे. या जागांवरील उमेदवार मात्र भाजपच्या सहमतीनेच ठरविले जात असल्याचे चित्र आहे.

●भाजपने सर्वेक्षणाचे दाखले देत शिंदेंना अनेक ठिकाणी उमेदवार बदलणे भाग पाडले. नेमका हाच निकष ठाण्यासह दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई व नाशिक या मतदारसंघामध्ये लावला जात असल्याचे समजते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ready to give thane lok sabha seat of chief minister eknath shinde to shinde shiv sena amy