कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हा सचिव विलास रंदवे यांनी रविवारी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने कल्याण पश्चिमेत शिवसेनेने भाजपला धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशावरून येत्या काळात कल्याण पश्चिमेत शिवसेना-भाजपमध्ये जोरदार खडाखडी होण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा प्रस्थापित मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून भाजपचे नरेंद्र पवार, वरूण पाटील यांनी निवडणूक लढविण्यासाठी जोरदार व्यूहरचना आखली आहे. भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेनेने भाजप जिल्हा सचिव रंदवे यांना शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात घेऊन भाजपच्या इच्छुकांसह प्रदेश नेत्यांना धक्का दिला आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर, शहरप्रमुख रवी पाटील, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.

हेही वाचा : कल्याणमधील पत्रीपुल येथे बॉयलरवाहू वाहनाचा पुलर उलटल्याने वाहन कोंडी

यापूर्वी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम मतदारसंघात बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यावेळी तसा प्रयत्न भाजपने केला तर शिवसेनेकडून डोंबिवली, मुरबाड, कल्याण पूर्व या भाजप प्रस्थापित उमेदवारांच्या मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न आहेत. त्याला पहिला झटका देण्याचे काम शिवसेनेने केले आहे.

कल्याण पश्चिममध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी स्वताला नेते समजू लागले आहेत. महायुतीमध्ये ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे बलस्थान आहे त्यांनी त्या जागा लढवायच्या आहेत. असे असताना कल्याण पश्चिमेतून भाजपचे पवार, पाटील हे निवडणुकीची तयारी करत आहेत. हे महायुतीच्या युती धर्माला न पटण्यासारखे आहे, असे अरविंद मोरे यांनी सांगितले. भाजपने मोठा भाऊ म्हणून शिवसेनेच्या पाठीत खंजिर खुपसू नये. तसा प्रयत्न झाल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा मोरे यांनी दिला आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये तलवार हातात घेऊन हल्लेखोराचा तरूणाला मारण्याचा प्रयत्न

डोंबिवलीत शिवसेनेच्या एका युवा नेत्याने आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरुध्द डोंबिवलीतून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली आहे. पण त्या नेत्याला गार करण्यात भाजपला आता यश आले आहे. तरी अन्य पक्षाच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरुध्द निवडणूक लढविण्याची या युवा नेत्याची महत्वाकांक्षा आहे. कल्याण पूर्वेतही भाजप, शिवसेनेत बंडखोरीची चिन्हे आहेत. कल्याण, डोंबिवलीतील शिवसेना, भाजपमधील या रस्सीखेचीमधून ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडाळी माजण्याची चिन्हे आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp s kalyan district president vilas randve joined shivsena eknath shinde faction css