बदलापूर : लोकसभा निवडणुकीची तारीख घोषित झाल्यानंतर इच्छुक आणि घोषित झालेल्या उमेदवारांची प्रचारासाठी लगबग सुरू आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांची नुकतीच कपिल पाटील यांनी भेट घेतली. याबाबत त्यांनी स्वतःच्या आपल्या समाज माध्यम खात्यावरून माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकाच पक्षात असले तरी खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात मोठी अंतर्गत धुसफूस याआधीही पाहायला मिळाली आहे. या दोघांमधील शाब्दिक चकमकी सर्वज्ञात आहेत. विकास कामावरून कपिल पाटील यांनी अनेकदा किसन कथोरे यांना कोंडीत पकडल्याचे दिसून आले होते. काही महिन्यांपूर्वी आपल्या कारकीर्दीच्या १९ वर्षांच्या प्रवासावर आयोजित एका कार्यक्रमात आमदार किसन कथोरे यांनी कपिल पाटील यांना आमंत्रण दिले होते. त्या आमंत्रणाला प्रतिसाद देत कपिल पाटील यांनीही किसन कथोरे यांच्या मुलाखत कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती.

हेही वाचा…भिवंडीत उमेदवारीवरून महाविकास आघाडीत स्पर्धा; सुरेश म्हात्रे, निलेश सांबरे हे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील

मात्र लोकसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी पुन्हा माध्यमांमधून कथोरे आणि पाटील यांच्यात स्पर्धा सुरू होती. भाजपने देश पातळीवर जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यानंतर कपिल पाटील यांनी आमदार किसन कथोरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी प्रचाराबाबत चर्चा झाल्याची माहिती कपिल पाटील यांनी समाज माध्यम खात्यावरून दिली आहे. गेल्या निवडणुकीतही कपिल पाटील यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेनेतील एक गट विरोधात प्रचार करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या शहरातील ठाणे मेट्रोला विलंब का होतोय? आता डिसेंबर २०२५चा मुहूर्त?

आमचं ठरलय अशी एक मोहीम काही नाराज भाजप समर्थकांनी चालवली होती. मात्र त्यानंतरही कपिल पाटील यांचा भरघोस मतांनी विजयी झाला होता. काही महिन्यांपूर्वी आमदार किसन कथोरे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र कथोरे यांनी त्याला पूर्णविराम दिला. त्यानंतर आता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर कथोरे आणि पाटील यांच्या भेटीने भाजपातील शीतयुद्ध संपल्याच्या चर्चा रंगल्या आहेत येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. कपिल पाटील यांच्यासमोर इंडिया आघाडीतून कोणता उमेदवार दिला जातो याकडे आता लक्ष लागले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp s mp kapil patil begins campaign for bhiwandi lok sabha seat meets mla kisan kathore psg