कल्याण– कल्याण पूर्वेत तिसगाव येथे दोन दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीची तिच्या घराच्या दारात एका तरुणाने निर्घृण हत्या केली. या प्रकरणातील तरुणाला कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी भाजप कल्याण विभागातर्फे शुक्रवारी संध्याकाळी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढण्यात आला. कल्याण पूर्वे काटेमानिवली भागातील पालिकेच्या ड प्रभाग कार्यालय येथून मोर्चाला सुरूवात झाली. पोलीस बंदोबस्तात मोर्चा विठ्ठलवाडी येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर नेण्यात आला.
हेही वाचा >>> मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापुर्वी खुली होणार; बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती
अतिशय शांततेत काढण्यात आलेला मोर्चा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आल्यावर शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात कोणत्याही त्रृटी राहणार नाहीत. आणि आरोपीला त्याचा फायदा होईल अशी कोणतीही कृती करू नये. कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशा मागण्या भाजपच्या शिष्टमंडळाकडून पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांन शाळा, महाविद्यालये, विरंगुळा, खाडी किनारच्या ठिकाणची गस्त वाढविण्याच्या सूचना आयोगाने कल्याणच्या पोलिसांना केल्या आहेत.