ठाणे – शहरात गावदेवी मैदान, घंटाळी मैदान, भगवती मैदान सारखी मोठी मैदान आहेत. परंतू , याठिकाणी ऐन उन्हाळी सुट्टीत भरविण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रदर्शनामुळे स्थानिक मुलांना खेळायला मैदान शिल्लक राहिले नसल्याची बाब समोर ही बाब लक्षात घेऊन भाजपाचे माजी नगरसेवक सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी स्थानिक मुलांना घेऊन महापालिकेच्या प्रवेशद्वारावर क्रिकेट खेळत आंदोलन केले.
उन्हाळी सुट्टीचा हा कालावधी असून या सुट्यांमध्ये अनेकांचा कल हा मैदानी खेळ खेळण्याकडे असतो. परंतू, अलिकडे बऱ्याच ठिकाणी मैदानेच शिल्लक राहिली नसल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे मैदानी खेळ खेळायचे तरी कुठे असा प्रश्न मुलांसमोर निर्माण होतो. ठाणे शहरात स्थानक परिसर आणि नौपाडा परिसराजवळ गावदेवी, घंटाळी आणि भगवती असे तीन मैदाने आहेत. परंतू, ही मैदाने खेळण्यासाठी उपलब्धच नसल्याची खंत काही मुलांनी व्यक्त केली.
या मैदानांमध्ये वारंवार काहींना काही कार्यक्रम किंवा प्रदर्शन भरविले जात असल्याचे दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन भाजपाचे माजी नगरसेवक सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी स्थानिक मुलांना घेऊन ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर क्रिकेट खेळत आंदोलन केले. ही मैदाने आठ दिवसात स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मोकळी करुन दिली नाही तर, या मुलांसोबत आयुक्तांच्या दालनात क्रिकेट खेळू असा खोचक इशारा महापालिकेला देण्यात आला आहे.
आरोप काय ?
ठाणे महापालिकेने २०१९ मध्ये गावदेवी मैदान हे फक्त स्थानिक मुलांना खेळांसाठी उपलब्ध असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे व्यावसायिक प्रदर्शन भरवता येणार नाही, अशा प्रकारचा ठराव महासभेत मंजूर केला होता. परंतू, असे असूनही या मैदानात दिवाळी महोत्सव, हिवाळ्यात नाताळ महोत्सव, संक्रांतीला एवढ्या वस्तूंची खरेदी करा आणि पैठणी जिंका, तर अलिकडे भरविण्यात आलेला चैत्र पालवी महोत्सव अशा या महोत्सवांमुळे मैदान १५ दिवस किंवा महिनाभर आडविली जातात.
भाडेदर आकारुन ही मैदाने प्रदर्शनासाठी सर्रासपणे दिली जात आहेत. प्रदर्शनाचे आयोजक देखील यामाध्यमातून लाखो रुपये कमवत असल्याचा आरोप माजी नगरसेविका मृणाल पेंडसे आणि सुनेश जोशी यांनी केला. तर, घंटाळी आणि भगवती मैदान देखील काही राजकीय मंडळी चालवत आहेत. तेथेही असाच प्रकार घडत आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या मंडळींना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ही मैदाने आंदण दिले आहे का? असा संतप्त सवाल स्थानिक माजी नगरसेवक सुनेश जोशी यांनी केला.
मुलांची खंत
आम्हाला उद्योजकांच्या श्रीमंत मुलांसारखे टर्फ मैदानावर तासाला ३०० रूपये देऊन खेळायला शक्य होत नाही. विरंगुळा म्हणून सुट्टीच्या दिवशी क्रिकेट, फुटबॉल खेळायला गावदेवी मैदान जावे असे वाटते. परंतू, त्याठिकाणी काहीना काही कार्यक्रम सुरु असल्यामुळे खेळायला मिळत नसल्याची खंत काही मुलांनी व्यक्त केली.