ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनी करोना काळात केलेल्या आंदोलनासंबंधीच्या गुन्ह्याची माहिती लपविल्याचा आरोप करत त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यासंबंधी शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे यांनी केलेली मागणी निवडणुक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. यामुळे केळकर यांचा उमेदवारी अर्ज कायम झाला असला तरी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा विचारे यांनी दिल्याने केळकर अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून भाजपने आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. शिवसेना (ठाकरे गट) तर्फे राजन विचारे यांना तर, मनसेने अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. या सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यांच्यासह अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. यानंतर बुधवारी सकाळी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रीया पार पडली. यावेळी भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या उमेदवारी अर्जावरच शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे यांनी हरकत घेतली. करोना काळात संजय केळकर यांनी आंदोलन केले होते. या संदर्भात केळकर यांच्यावर नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. परंतु त्या गुन्ह्याची माहिती केळकर यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली नसून या गुन्ह्याची माहिती लपविल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद व्हावा अशी मागणी राजन विचारे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे केली. 

हेही वाचा >>>शहापूरच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना हद्दपार

विचारे यांनी उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याने केळकर यांचा अर्ज बाद होईल, अशी चर्चा शहरात सुरू झाली होती. या चर्चेमुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते भेदरले होते. परंतु निवडणुक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी याप्रकरणी सुनावणी घेऊन विचारे यांची हरकत फेटाळून लावत केळकर यांचा अर्ज कायम केला. यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. यामुळे केळकर यांचा उमेदवारी अर्ज कायम झाला असला तरी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा विचारे यांनी दिल्याने केळकर अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

संजय केळकर यांच्यावर उमेदवारी अर्जावर घेतलेली हरकत निवडणुक विभागाने फेटाळून लावत न्यायालयात जाण्यास सांगितले. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आता आम्ही दाद मागणार आहोत. दाखल झालेले गुन्हे लपवत असतील तर, त्याचा विचार मतदार करतील. –राजन विचारे, उमेदवार, शिवसेना (उबाठा)