प्रदेश नेतृत्वाने तंबी दिल्यानंतर युतीची घोषणा

भाईंदर : लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत युती घोषित झाल्यानंतरही मीरा-भाईंदर शहरात या दोन्ही पक्षात मनोमीलन झाले नव्हते. काही ना काही कारणावरून सेना आणि भाजपमध्ये संघर्ष सुरूच होता. परंतु राज्यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही युती करण्याचे आदेश प्रदेश पातळीवरून आल्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये या दोन्ही पक्षांनी आपापल्या तलवारी म्यान करून एकत्र नांदायचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात एकत्र येण्याचा निर्णय भाजप आणि शिवसेनेने प्रदेश पातळीवर घेतला होता. परंतु मीरा-भाईंदरमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येत नव्हते. महापलिकेत एकहाती सत्ता स्थापन केलेल्या भाजपला शिवसेनेची गरज वाटत नसल्याने दोन्ही पक्षांमध्ये खटके उडत होते. एकमेकांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालणे, सातत्याने एकमेकांविरोधात प्रतिक्रिया देणे या प्रकारांमुळे लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्रित काम करणार का, असाच प्रश्न उपस्थित होत होता.

एकत्रित कामाच्या आणाभाका

केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन करायची असेल तर राज्यातील प्रत्येक जागा महत्त्वाची आहे, याची जणीव प्रदेश पातळीवरील नेतृत्वाला असल्याने स्थानिक पातळीवरही एकदिलाने काम करा, असा दट्टय़ा दोन्ही पक्षाच्या राज्य नेतृत्वाकडून देण्यात आला आहे. त्यामुळेच मीरा-भाईंदरमध्ये दोन्ही पक्षांनी यापुढे एकत्र काम करण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नुकत्याच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी झाले गेले विसरून जाऊन यापुढे महापालिकेत युती करण्यात येत असल्याची घोषणा केली.

विरोधी पक्षनेतेपदावरील दावा कायम

युती झाल्याने शिवसेना यापुढे भाजपच्या सुरात सूर मिळवणार असल्याने शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका निभावणार नाही आणि विरोधी पक्षनेतेपदावरील आपला हक्क सोडेल, असे अपेक्षित होते. परंतु विरोधी पक्षनेतेपद हे सभागृहातील दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या पक्षाला मिळते, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच राहील, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. भाजपने उदार मनोवृत्तीचे प्रदर्शन केले तर सत्तेतील काही पदे आम्हाला मिळतील, अशी आशाही सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली. भाजपकडून आमदार नरेंद्र मेहता यांनीही विरोधी पक्षनेतेपदावरून शिवसेनेचे समर्थन केले. याआधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र असताना विरोधी पक्षनेतेपद या पक्षांकडेच राहिले होते याची आठवण मेहता यांनी यावेळी करून दिली.

Story img Loader