सुशोभीकरणाच्या कामावरून भाजप, शिवसेना आमने-सामने
भाईंदर : एकेकाळी इंग्रज आणि मराठय़ांमध्ये झालेल्या लढाईतील तलवारींचा खणखणाट अनुभवलेला आणि मीरा-भाईंदर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला घोडबंदर किल्ला पुन्हा एकदा नव्या लढाईला सामोरा जाण्यास सज्ज झाला आहे. परंतु या वेळची लढाई खरीखुरी लढाई नसून किल्ल्याच्या सुशोभीकरणावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू झालेली ही राजकीय लढाई आहे.
भग्नावस्थेत असलेल्या घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणास शासनाने मंजुरी दिली आहे. दिवाळीच्या आधी या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला जाणार होता. परंतु या कामात सत्ताधारी भाजपने आडकाठी आणल्याने कामाला सुरुवात होऊ शकली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या आरोपांचे भाजपने खंडन केले आहे. सुशोभीकरणाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या हाती नसताना घाईघाईने कामाचे उद्घाटन करणे योग्य नाही, असा खुलासा भाजपने केला आहे. भाजप आणि शिवसेनेने उपसलेल्या या आरोपांच्या तलावारींचा घोडबंदर किल्ला सध्या साक्षीदार बनला आहे.
मूळचा पोर्तुगिजांनी बांधलेल्या या किल्ल्याला शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे. परंतु सध्या ढासळलेले बुरुज, तडा गेलेल्या तटबंदी, माजलेले रान अशी अवस्था या किल्ल्याची झालेली आहे. अशा या घोडबंदर किल्ल्याचे संवर्धन करण्याच्या तसेच किल्ल्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या घोषणा गेल्या सात ते आठ वर्षांपासून सातत्याने केल्या जात आहेत. या ठिकाणी शिवसृष्टी उभारली जाणार असल्याचे देखील वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.
यंदा दिवाळीच्या आधी कामाला सुरुवात करण्यात येणार आहे असे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले होते. परंतु दिवाळी सरली तरी कामाचे उद्घाटन झाले नाही. या कामाच्या श्रेयवादावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.
किल्ल्याची दुरुस्ती आणि सुशोभीकरण यासाठी गेल्या सात वर्षांपासून आपण प्रयत्नशील आहोत. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर कामाची निविदादेखील मीरा-भाईंदर महानगरपालिकेने काढली. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत ५ नोव्हेंबरला काम सुरू करण्याचे नक्की करण्यात आले होते. परंतु स्थानिक भाजप नेत्यांनी याचे राजकारण करण्यास सुरुवात केल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
येत्या महिन्याभरात कामाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
‘कामाला लवकरच सुरुवात’
घोडबंदर किल्ला महापालिकेकडे हस्तांतर झाला असल्याचे अधिकृत पत्र अद्याप मिळालेले नाही. किल्ला सीआरझेडअंतर्गत येतो त्यामुळे या विभागाची परवानगी काम सुरू करण्याआधी घेणे आवश्यक आहे. परवानगी नसताना काम हाती घेतले तर महापालिकेवर गुन्हा दाखल होईल. असे असताना घाईगडबडीने उद्घाटनाचा कार्यक्रम आखण्यात आला होता. सर्व परवानग्या मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच कामाचा शुभारंभ केला जाईल, अशी माहिती भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली.