ठाणे : २०२४ मध्ये तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय, असा प्रश्न विचारत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची ‘मन की बात’ जाणून घेतली. त्यावर ‘देवेंद्र फडणवीस’ यांचे नाव भाजपच्या कार्यकर्त्यांनी एखमुखी घेतले. यानंतर तुम्हाला जो कोणी मुख्यमंत्री हवाय, त्यासाठी कामाला लागा, असा सुचक इशारा बावनकुळे यांनी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा >>> दुर्गाडी-मोठागाव वळण रस्त्याच्या ५९८ कोटीच्या निविदेला मंजुरी; कामाला लवकरच प्रारंभ
भाजपाच्या महाविजय २०२४ अभियानातर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचे दौरे करीत असून त्यांनी मंगळवारी ठाणे लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ठाणे शहरातील गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपाने नियुक्त केलेल्या एक हजार कार्यकर्त्यांसोबत बावनकुळे यांनी संवाद साधला.
हेही वाचा >>> ठाण्यात आपला दवाखान्यासाठी २२ जागा निश्चित
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची ‘मन की बात’ जाणून घेतली. २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवय? बोला तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय? असा प्रश्न बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला. त्यावर ‘देवेंद्र फडणवीस’ यांचे नाव कार्यकर्त्यांनी एकमुखी घेतले. त्यावर आवाज येत नसून जोरात बोला असे बावनकुळे यांनी सांगितले. यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा ‘ देवेंद्र फडणवीस ‘ यांचे नाव घेतले. या मागणीनंतर बावनकुळे यांनी ‘ मग लागा कामाला ‘ असा सुचक इशारा कार्यकर्त्यांना दिला.