ठाणे : आपल्या विरोधात कट कारस्थान रचले जात आहे, अशा शब्दात मनातील अस्वस्थता बोलून दाखवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडले असतानाच, शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाजपने रविवारी नवा डाव टाकल्याचे स्पष्ट झाले. सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक या ज्या प्रभागातून निवडून येतात. त्या शिवाई नगर पट्ट्यातील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशैट्टी यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने या पट्ट्यात नवी राजकीय सुरु चाचपणी केल्याचे स्पष्ट झाले. बैरीशेट्टी यांचे पती भास्कर हे सरनाईक यांचे कडवे विरोधक मानले जातात.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर बैरीशेट्टी पती-पत्नीने लोकसभा निवडणूकीच्या तोडांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. बैरीशेट्टी दाम्पत्य हे उपवन, शिवाईनगर, वसंत विहार यासारख्या भागात प्रभाव राखून असतात. आक्रमक राजकरणासाठी ओळखले जाणारे बैरीशेट्टी यांचे आणि सरनाईक कुटुंबियांमध्ये राजकीय स्पर्धा नेहमी पाहायला मिळाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असतानाही बैरीशेट्टी दाम्पत्य उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेले. राज्यात सत्ता नसतानाही, हे कुटुंब प्रताप सरनाईक यांच्याविरोधात आक्रमकपणे राजकारण करताना दिसत होते. विधानसभा निवडणूकीतील दारूण पराभवानंतर मात्र, बैरीशेट्टी दाम्पत्याचा धीर खचला. सरनाईक यांच्यामुळे शिंदे पक्षात घेत नाहीत तर सत्ता नसल्यामुळे ठाकरे गटाला कोणी जुमानत नाही. अशा परिस्थितीत सरनाईक यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यासोबत दोन हात करणे बैरीशेट्टी यांना शक्य नव्हते. शिवाईनगर, पवारनगर, वसंत विहार यासारख्या पट्ट्यात भाजपच्या कमळ चिन्हावर मतदान करणारा एक मोठा वर्ग आहे.

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणूकीत भाजपने या भागातील प्रभावी नेते सुधाकर चव्हाण यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पक्षाचे हे गणित चुकले आणि सरनाईक यांचे पॅनल निवडून आले. या पॅनलमध्ये रागिणी बैरीशेट्टी या देखील होत्या. आगामी महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजपने या भागात पुन्हा एकदा जुळवा-जुळव सुरु केली आहे. दिवंगत सुधाकर चव्हाण यांच्या कुटुंबियांशी भाजपचे निकटचे संबंध आहे. या भागातील पक्षाचे प्रभावी पदाधिकारी आणि हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांच्या रुपाने भाजपकडे प्रभावी चेहरा देखील आहे. असे असताना रागिणी बैरीशेट्टी आणि भास्कर बैरीशेट्टी यांना पक्ष प्रवेश देत भाजपने भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे.

केळकर, वाघुले आक्रमक

बैरीशेट्टी यांना प्रवेश देताना भाजपचे आमदार संजय केळकर आणि जिल्हाध्यक्ष संजय वाघुले या दोघांनी नियोजनबद्ध पद्धतीने खेळी केल्याचे दिसून आले. शिवाई नगर, वर्तकनगर, वसंत विहार यासारख्या पट्ट्यात पक्षाला चांगला वाव आहे असे केळकर यांचे पूर्वीपासून मत आहे. त्यामुळे बैरीशेट्टी यांच्या पक्ष प्रवेशासाठी केळकर आणि वाघुले या दोघांनी श्रेष्टींकडून सहमती मिळविल्याचे समजते. वन मंत्री गणेश नाईक यांच्या पाठोपाठ केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनीही जनता दरबार सुरु केला आहे. नाईक यांनी तर ठाणे शहरात फक्त कमळ अशी घोषणा देऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला यापूर्वीच डिवचले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग स्तरावरील प्रभावी नेते पक्षात आणून महापालिका निवडणूकांची तयारी भाजपने सुरु केली आहे.

Story img Loader