उल्हासनगर महापालिकेची निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली असून महापालिका निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेनेच्या हाती असलेली सत्ता काबीज करण्याचा जोरदार प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना या मोहिमेवर पाठवल्याचे बोलले जाते. पालिकेच्या निवडणुकीत भरीव कामगिरी करतानाच दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाची ताकद वाढवण्याचा भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा विचार आहे.
उल्हासनगर शहरात कधी नव्हे ती राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकेकाळचे कट्टर विरोधक एका आघाडीत एकवटले आहेत. सिंधी मतांच्या जोरावर मोदी लाटेतही तरणाऱ्या ज्योती कलानी यांनी इतिहासच घडवला. त्यामुळे या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी भाजपने हालचाली केल्या. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून उल्हासनगरमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. त्यातील कल्याण पूर्व भागात भाजप समर्थक गणपत गायकवाड निवडून आले आहेत. त्यापुढील मुरबाड मतदारसंघात भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे ‘शतप्रतिशत भाजप’साठी भाजपने राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली होती. त्याच रणनीतीनुसार ओमी कलानीला भाजपसोबत घेण्यात आले. तसेच शिवसेनेचा गड असलेला उल्हासनगर कॅम्प ४ आणि ५ भागात भाजपने घुसखोरी करत तीन नगरसेवक पळवले. त्यामुळे साधारणत: ३० हजार मतदारांवर प्रभाव टाकण्याची भाजपची रणनीती आहे. त्यामुळे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मोठय़ा आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच उल्हासनगर महापालिका भाजपच्या ताब्यात आल्यानंतर लोकसभा निवडणुकीतही याचा फायदा होणार असल्याचे बोलले जाते. कारण डोंबिवली, कल्याण या विधानसभा मतदारसंघातही भाजपने आपले पाय रोवले आहेत.
मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण या दोन दिग्गज नेत्यांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी कँाग्रेसच्या ओमी कलानी व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्याचा प्रयत्न केला. थेट प्रवेश झाला नसला तरी टीम कलानीसोबत भाजपने आघाडी केली. दुसरीकडे विद्यमान नगरसेवक विजय पाटील, मीना सोंडे, रवि पाटील व माजी नगरसेवक किशोर वनवरी व अन्य नेत्यांनी सेनेत प्रवेश केला.