शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबरोबरच विविध ठिकाणी वाहनतळाची उभारणी करण्याचे आश्वासन भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी बुधवारी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात दिले आहे. त्याचबरोबर शैक्षणिक हबच्या निर्मितीबरोबरच जुन्या अधिकृत इमारतींचा वेगाने पुनर्विकास होण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
ठाणे शहरामध्ये बुधवारी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते संजय केळकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळेस शिवसेनेचे खासदार राजन विचारे उपस्थित होते. या जाहीरनाम्यामध्ये विविध कामांची तसेच प्रकल्पांच्या उभारणीची आश्वासने देण्यात आली आहेत. त्यामध्ये अंतर्गत मेट्रो, जलवाहतूक, कोस्टल रोडचे काम, गृहसंकुलांमध्ये पणन विभागाच्या माध्यमातून कॉपी शॉपची साखळी, मानीव अभिहस्तांतरण लवकर होण्यासाठी कायद्यात बदल, विविध भागांत वाहनतळांची उभारणी अशी आश्वासने देण्यात आली आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मनोरुग्णालयाच्या जागेवर नव्या स्थानकाच्या कामासाठी पाठपुरावा, कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाचे काम वेगाने होण्यासाठी प्रयत्न, सिडको ते कळवा दरम्यान पादचारी पुलाचे काम, टीएमटीच्या ताफ्यात बसची संख्या वाढविणे अशा कामांवर भर देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. अभ्यासिका, महिलांसाठी वसतिगृह, शून्य कचरा मोहीम, दिव्यांग सहायता केंद्र, शहरात सीसीटीव्हीचे जाळे, अल्पदरात सांस्कृतिक सभागृह, चौपाटय़ा व चौकांचे सुशोभीकरण, येऊर डोंगर, खाडी किनारे, ऐतिहासिक वास्तूंच्या दर्शनासाठी ठाणे दर्शन बससेवा अशी आश्वासने दिली आहेत.